वृद्धेचा खून करणाऱ्याला जन्मठेप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर: जुन्या वादातून वृद्धेचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर, महिलेच्या मुलाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. महेंद्र महादेव बिनकर (34, रा. सोनार टोली) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने, परिसरातच राहणाऱ्या ज्योती पप्पू शिंदे (65) या वृद्ध महिलेचा खून केला होता. तसेच, या महिलेच्या मुलावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले होते.
सदर घटना 22 मे 2016 रोजी यशोधरानगर येथील सोनार टोळी परिसरामध्ये घडली होती. वृद्ध महिलेचा मुलगा कपिल पप्पू शिंदे (30) आणि आरोपी महेंद्र महादेव बिनकर यांच्यामध्ये जुना वाद होता. याच वादातून घटनेच्या दिवशी आरोपी महेंद्र याने कपिलवर वार केला. त्यामध्ये, त्याच्या डाव्या भुवईला गंभीर जखम झाली. हा वाद सोडविण्यासाठी कपिलची आई आली असता आरोपीने त्यांच्या छातीवर वार केले. यामध्ये, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पप्पू शिंदे याने यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, 23 मे 2016 रोजी आरोपी महेंद्र बिनकर याला पोलिसांनी अटक केली.
सर्व साक्षी आणि पुरावे तपासल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीला कलम 302 अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली असून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष आणखीन शिक्षा भोगावी लागेल. तर, कलम 324 अंतर्गत सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास 15 दिवसांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. न्यायालयामध्ये सरकारी वकील म्हणून ऍड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. तर, आरोपीतर्फे ऍड. प्रभाकर भुटे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास यशोधरानगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदून यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com