शेतजमीन मोजणीच्या वादात खून : पिता-पुत्रास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

यवतमाळ : शेतजमीन मोजणीच्या वादात जावयाचा खून करून अन्य एका नातेवाइकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी पिता-पुत्रास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बुधवारी (ता.28) हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी दिला.

यवतमाळ : शेतजमीन मोजणीच्या वादात जावयाचा खून करून अन्य एका नातेवाइकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी पिता-पुत्रास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बुधवारी (ता.28) हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी दिला.
अरविंद संगीतराव देशमुख (वय 57), प्रणीत अरविंद देशमुख (वय 29, दोघेही रा. गांधीनगर, अमरावती) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. आरोपी व मृत नातेवाइक असून, त्यांच्यात शेतजमिनीवरून वाद सुरू होता. प्रफुल रमेश भैसे, असे मृताचे नाव आहे. तर, विलास भाऊराव देशमुख (रा. शिवाजीनगर, नेर) हा जखमी झाला होता. दोघेही 22 जून 2016 ला चिखली कान्होबा शेतशिवारात मोजणी अधिकाऱ्यांना घेऊन गेले होते. आरोपीची आई व पत्नी यांना तिथे त्यांनी धमकाविले. त्यावेळी आरोपींनी लपवून ठेवलेले भाले आणून प्रफुल भैसे, विलास देशमुख यांच्यावर हल्ला चढविला. गंभीर जखमी झाल्याने प्रफुलला उपचारासाठी सावंगी मेघे येथे हलविण्यात आले. मात्र, 26 जूनला त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बंडू बोरकर यांनी नेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरुद्घ गुन्हा नोंद करून पोलिस निरीक्षक गणेश भावसार यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
सरकारीपक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी बोरकर, मोजणी अधिकारी शामराव चौधरी, जखमी विलास देशमुख, डॉ. अमोल येलणे यांची साक्षी ग्राह्य धरण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यात पिता-पुत्रांना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व 307 च्या गुन्ह्यात सात वर्षे शिक्षा सुनावली. सबळ पुराव्याअभावी पुष्पा उर्फ बेबी देशमुख हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजय तेलंग यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life imprisonment punishment to father and son