लेकीच्या सतर्कतेने वाचले आईचे प्राण 

लेकीच्या सतर्कतेने वाचले आईचे प्राण 

नागपूर - वृद्ध आईचा गळा आवळल्यानंतर तिला वाचविण्यास गेलेल्या लेकीचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखल्यामुळे आईचा जीव वाचला. या घटनेमुळे यशोधरानगर परीसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी धाव घेत आरोपीला पकडून ठेवून चांगला चोप दिला. 

या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गुड्डू ऊर्फ अविनाश घनश्‍याम मालवीय (28, रा.जरीपटका) याला अटक केली आहे. जखमींमध्ये प्रमिला श्रीचंद विश्वकर्मा (60) आणि कविता श्रीचंद विश्वकर्मा (28) या मायलेकींचा समावेश आहे. पोलिसांनी कविताने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुड्‌डू हा प्रमिला यांच्या बहिणीचा मुलगा आहे. तो खासगी ड्रायव्हर आहे. प्रमिला यांची मुले दिल्लीतील एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहेत. कविता घरीच शिकवणी वर्ग चालवते. 

काही महिन्यांपूर्वी गुड्डूच्या विवाहासाठी प्रमिला यांनी 4 लाख रुपये कर्जाने दिले होते. गुड्डूने शनिवारी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. दुपारी पाऊणच्या सुमारास तो त्यांच्या घरी पोहोचला. त्याने सायंकाळी पैसे देतो असे सांगत घर विक्री करण्याबाबत विचारले. त्याने प्रमिला यांना वरच्या माळ्यावर नेले. तेथे त्याने वायरने प्रमिला यांचा गळा आवळला. प्रमिला या जोरात ओरडल्या आणि बेशद्ध झाल्या. 

मुलीला आला संशय 
मावस भावासोबत वरच्या माळ्यावर गेलेली आई खाली न परतल्यामुळे कविता तेथे गेली. यावेळी पाल दिसल्यामुळे मावशी ओरडल्याची थाप गुड्‌डूने मारली. मात्र, कविताला त्याच्या वागण्याचा संशय आला. ती खोलीत गेली असता तिला आई बेशद्धवस्थेत दिसली. ती काही करण्यापूर्वीच गुड्डूने वायरने तिचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. 

शेजाऱ्यांनी दिला चोप 
कविताने जोरात आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी तिचा आवाज ऐकून घराकडे धाव घेत गुड्डूला पकडले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस येईपर्यंत त्याला नागरिकांनी चांगला चोप दिला. काही जणांनी प्रमिला यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com