परिचारिकांच्या सेवेतून मिळाले जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

नागपूर ः रुग्णसेवा या ध्येयाला समर्पित जीवन जगत असलेल्या परिचारिकांच्या सेवेतून करुणा आणि दयेचे मूर्तिमंत उदाहरण पुढे आले. महिनाभरापासून मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 19 मध्ये बेवारस रुग्णाच्या जखमांवर मायेची फुंकर मारत आईपेक्षाही वत्सलतेने सेवाशुश्रूषा करीत पन्नाशीतील रुग्णाचा जीव वाचवला. रुग्ण बरा झाल्यानंतर दोन्ही हात जोडून त्याने परिचारिकांचे आभार मानले. परिचारिकांनी केलेल्या सेवेला सलाम केल्यावाचून राहवत नाही. मात्र स्वतःच्याच लेकीकडून उपेक्षेच्या वेदना सहन कराव्या लागलेल्या रुग्णाला "स्नेहांचल' या सेवाभावी संस्थेत पाठवण्यात आले.

नागपूर ः रुग्णसेवा या ध्येयाला समर्पित जीवन जगत असलेल्या परिचारिकांच्या सेवेतून करुणा आणि दयेचे मूर्तिमंत उदाहरण पुढे आले. महिनाभरापासून मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 19 मध्ये बेवारस रुग्णाच्या जखमांवर मायेची फुंकर मारत आईपेक्षाही वत्सलतेने सेवाशुश्रूषा करीत पन्नाशीतील रुग्णाचा जीव वाचवला. रुग्ण बरा झाल्यानंतर दोन्ही हात जोडून त्याने परिचारिकांचे आभार मानले. परिचारिकांनी केलेल्या सेवेला सलाम केल्यावाचून राहवत नाही. मात्र स्वतःच्याच लेकीकडून उपेक्षेच्या वेदना सहन कराव्या लागलेल्या रुग्णाला "स्नेहांचल' या सेवाभावी संस्थेत पाठवण्यात आले. डबडबलेल्या डोळ्यांनी वॉर्डातून जड पावलं टाकीत निघालेल्या त्या रुग्णाला बघून वॉर्डातील परिचारिकांसह साऱ्यांचे डोळे भरून आले.
5 ऑक्‍टोबरचा दिवस होता. सकाळीच कोण्यातरी व्यक्तीने पन्नाशीतील या रुग्णाला मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात आणून सोडून दिले. त्याच्या हातात कार्ड होते. या विभागातील श्रीमती डॉ. बोकरे यांनी भरती करून घेतले. या रुग्णाच्या तोंडापासून तर मानेपर्यंतच्या त्वचेवर जखम पसरली होती. त्वचेवरील जखमेत अळ्या झाल्या होत्या. या अळ्यांमुळे पन्नाशीतील हा रुग्ण निपचित पडून राहत असे. वॉर्ड क्रमांक 19 मध्ये भरती झाल्यानंतर पहिल्याच त्यांना येथील इंचार्ज सिस्टर संयोगिता म्हैसगवळी यांनी सर्वांच्या मदतीने "टर्पेंटाइन ऑईल' चेहऱ्यावर घालून आंघोळ करून दिली. पहिल्या दिवशी आंघोळ करताना जखमेतून दोनशेवर अळ्या निघाल्या. चार ते पाच दिवस जखमेवर हे ऑइल घालून अळ्या काढण्याचे काम येथील परिचारिकांनी केले. विशेष असे की, या रुग्णाला जेवणही करता येत नव्हते. यामुळे डॉक्‍टरांच्या मदतीने त्याला नळीद्वारे दूध व इतर पातळ पदार्थ देण्यात येत होते. तब्बल 15 दिवस परिचारिकांनी सकाळी आंघोळ घालण्यापासून तर रात्रीचे जेवण देईपर्यंत आपापसात काम वाटून घेतले होते. तर सिस्टर म्हैसगवळी याचे नियोजन करीत होत्या. रुग्ण बरा झाल्यानंतर सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय) यांना कळविण्यात आले. सामाजिक अधीक्षकांनी रुग्णांशी संवाद सुरू केला. त्यांची ओळख पटली. त्यांच्या लेकीला कळविण्यात आले.

लेकीकडून मिळाल्या उपेक्षेच्या वेदना...
सामाजिक अधीक्षकांनी या रुग्णाच्या मुलीला माहिती दिल्यानंतर ती मुलगी बापाला भेटण्यासाठी मेडिकलमध्ये आली, भेटली. परंतु घरी नेण्यास नकार दिला. ज्या लेकीला लहानाची मोठी करून हात पिवळे करून दिले, तीच लेक बापाला घरी नेऊ शकत नसल्याचे शब्द कानावर आदळताच बापाच्या काळजात धस्स झाले. लेकीने दिलेली उपेक्षेची वागणूक आयुष्यभर विसरणार नसल्याचे भाव चेहऱ्यावर उमटले. गुडघ्यात मान घालून अश्रूंनी डबडबले डोळे लपवण्याचा प्रयत्न करीत खाटेवर लोटले.

स्वतःचे दुःख विसरून, मन तयार असो वा नसो, रुग्णसेवा करणे हाच परिचारिकांचा धर्म आहे. आजही परिचारिकांची आचारसंहिता रुग्णसेवा हीच आहे. त्यांच्या अनमोल सेवेचे मोल नाही. वॉर्डात भरती रुग्णांच्या खाटेकडे परिचारिकेशी नजर असते. गर्दीमुळे कधी संवाद साधताना आवाज चढतो, परंतु मनात सेवाभाव असतो. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात डॉक्‍टर, परिचारिकांसह सारेच सेवाभाव जपतात.
- डॉ. मालती डोंगरे, परिचारिका अधीक्षक (मेट्रन), मेडिकल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life support from the care of the hostess