अवयवदानातून चार जणांना जीवनदान

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः अपघातात मेंदूला जबर दुखापत झाल्याने "ब्रेन डेड झालेल्या 30 वर्षीय शरद परतेकी यांच्या अवयवदानासाठी असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. शरद यांच्या अवयवदानातून चौघांना जीवनदान मिळाले. तर दोघांच्या डोळ्यांत उजेड पेरल्याने त्यांचे आयुष्य उजळून निघाले. बुधवारी मेडिकलमधील ट्रॉमा केयर सेंटर येथे हे महाअवयवदान झाले. विशेष असे की, शरद यांचे हृदय पुण्याच्या दिशेने झेपावले असून हृदयाच्या प्रतीक्षेतील 30 वर्षीय तरुणीला जीवनदान मिळाले. किडनीदानातून दोघांना तर यकृत दानातून एकाला अशा चार जणांचा जीव मृत्यूला कवटाळताना शरदने वाचवला.
अवयदान करणारा शरद परतेकी मूळचा नागपूरचा. पार्वतीनगर येथे घर. घरची परिस्थिती हलाखीची. मात्र, अथक परिश्रम करून त्याने विजया बॅंकेत नोकरी मिळवली. नागपूर, गोंदिया येथून बीड येथे बदली झाली. शिपाईपदावरून त्याला नुकतीच लिपिकपदावर बढती मिळाली. हा आनंद त्याने कुटुंबासोबत अनुभवला. परंतु, नियतीला हे बघवले नाही. ऐन जागतिक अवयवदानाच्या दिन पर्वावर तो हे जग कायमचे सोडून गेला. तीन दिवसांपूर्वी 11 ऑगस्ट रोजी बीड येथे मित्रांसह दुचाकीवर गेला. येथे गंभीर अपघात झाला. मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला नागपूरमध्ये मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये हलवले. त्याचे आयुष्य व्हेंटिलेटरवरच होते. मात्र, उपचाराला दाद मिळत असल्याचे दिसून आले आणि काही वेळातच मेंदूमृत असल्याचे निदान झाले. नातेवाइकांना तशी माहिती देण्यात आली. शरदचा मृत्यू निश्‍चित असल्यामुळे नातेवाइकांच्या डोक्‍यावर दुःखाचा डोंगर कोसळला. भाऊ विनोद, पत्नी शीतल यांना श्‍याम पंजाला यांच्यासह अनेकांनी अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. पत्नी आणि भाऊ यांनी अवयवदानातून इतरांना जग पाहण्याची संधी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. तत्काळ विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे, समन्वयक वीणा वाठोडे यांना दिली. समितीने दिल्लीच्या समितीला सूचित केले. अवयवांची गरज असलेल्यांचा शोध घेतला. पुणे येथे 30 वर्षीय तरुणी हृदयाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हृदय पुण्याला पाठवले. प्रत्यारोपण झाले असल्याचे सांगण्यात आले. तर नागपुरात 61 वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतीक्षेत होते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि केयर रुग्णालयातील प्रत्येकी एक रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. यांना तत्काळ कळविण्यात आले.

सहा महिन्यांचे मूल झाले पोरके
मनमिळावू असलेल्या शरदला अवघ्या सहा महिन्यांचे मूल आहे. वडिलांच्या प्रेमाला हा चिमुकला पारखा झाला. आयुष्यात या मुलाला कधीच वडील दिसणार नाही, या भावनेतून पत्नी शीतलच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहत होता. लेकराचे नाव घेऊन बेटा. बेटा म्हणून तिने हंबरडा फोडला. शरदच्या घराच्या आजूबाजूचा परिसर शोकाकुल झाला होता. साऱ्यांचा आवडता असलेल्या शरदने जाताना चार जणांना जीवनदान दिले, तर दोघांच्या डोळ्यांमध्ये प्रकाश पेरला. ट्रॉमा केअर युनिटमध्ये अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. मोहंमद फैजल, डॉ. नरेश तिरपुडे, न्यूरो सर्जन डॉ. पवित्र पटनाईक, सामाजिक सेवा अधीक्षक श्‍याम पंजाला (वैद्यकीय) यांनी मानवंदना दिली. तर समाजापुढे अवयवदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या परतेकी कुटुंबाचे आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com