उघडून तर बघा! कापसाची वेचाई आठ रुपयावर 

दीपक खेकारे 
Sunday, 24 November 2019

  • मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्‍न सुटेना 
  • अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान 
  • फुटलेला कापूस वेचायला मजूर मिळेना 
  • धान व सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत उद्‌ध्वस्त 

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले. या पावसामुळे धान व सोयाबीन भुईसपाट झाली. अर्ध्याअधिक कपाशीचे शेत वाया गेले आहे. मोडकीतोडकी जमिनीवर टेकलेल्या कपाशीला जेमतेम बोंडे फुटली. फुटलेला कापूस वेचायला आता मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यात कापूस वेचनी आठ रुपयांवर गेली आहे. अस्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडे मोडले असताना आता मजुरी बळीराजाचा जिवावर उठली आहे. 

हवामान खात्याचा भविष्यवाणीवर बळीराजाने विश्‍वास ठेवला. लगबगीने पेरणी आटोपली. मात्र, हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला. पाऊस तब्बल महिनाभर उशिराने बरसला. पावसाच्या लपंडावाने बळीराजावर दुबार व तिब्बार पेरणीचे संकट ओढावले. मोठ्या हिंमतीने बळीराजाने शेती उभी केली. शेतातील कपाशीचे पीक बहरले. परंतु, निसर्गाने पुन्हा घात केला. 


जमिनीवर टेकलेला कापूस 

अवकाळी पावसाचा तड्याखात शेतातील पिके होत्याचे नव्हते झाले. धान व सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत उद्‌ध्वस्त झाले. काही प्रमाणात शेतात कपाशी शिल्लक उरली; मात्र आता वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कापसाची वेचणी केली नाही तर कापशाची प्रतवारी खराब होते. परिणाम कापसाच्या किंमतीवर परिणमा होत असते.

Image may contain: plant, tree, outdoor and nature
कापूस वेचताना महिला 

परिणामी बळीराजाला आर्थिक फटका बसतो. अशात मजुरांची शोधमोहीम सुरू आहे. मात्र, मिळालेले मजूर कापूस वेचनीचे आठ रुपये दर लावल्याने बळीराजाची अडचण वाढली आहे. 

Image may contain: plant, tree, sky, outdoor and nature

मागील वर्षीच्या तुलनेत भाव अधिक

गेल्यावर्षी सुरुवातीला पाच ते सहा रुपये प्रति किलो दराची वेचणी यावर्षी दुप्पट झाली आहे. यंदा मात्र आठ ते दहा रुपये प्रति किलो दराची मागणी मजुरांकडून करण्यात येत आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतातील कापसावर जंगली प्राणी आपली भूक भागवताना दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. 

पांढरे सोने काळे होण्याच्या मार्गावर

वेचणीला मजूर मिळत नसल्याने पांढरे सोने झाडालाच काळे होण्याच्या मार्गावर आहे. कापूस खराब झाला तर योग्य भाव मिळत नाही. वर्षभराची उलाढाल ज्या शेतातील उत्पन्नावर अवलंबून आहे असे पांढरे सोने मजूर मिळत नसल्याने काळे व्हायला सुरुवात झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lift cotton at eight rupees in chandrapur