हे तंत्रज्ञान ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान...कीड नियंत्रणासाठी लावले यंत्र

प्रा. रविकांत वरारकर | Monday, 20 July 2020

काळाची गरज व अपारंपरिक ऊर्जा स्रोत मर्यादित असल्याने एकात्मिक कीड व्यवस्थापनाअंतर्गत सौरऊर्जेवर आधारित प्रकाश सापळा विकसित करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे सर्वच प्रकारच्या किडीवर नियंत्रण करता येत असल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

भद्रावती (जि. चंद्रपूर) : शेतातील किडींना एक विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते. प्रकाश बघितल्यानंतर किडी त्याकडे झेप घेतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन सोलर लाइट इन्सेक्‍ट ट्रॅप (प्रकाश सापळा) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विकसित करण्यात आला आहे. भद्रावती तालुक्‍यातील सुमारे 360 शेतकऱ्यांनी या प्रकाश सापळ्याचे यंत्र शेतात बसविले आहे. या वापरामुळे कीड नियंत्रण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

काळाची गरज व अपारंपरिक ऊर्जा स्रोत मर्यादित असल्याने एकात्मिक कीड व्यवस्थापनाअंतर्गत सौरऊर्जेवर आधारित प्रकाश सापळा विकसित करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे सर्वच प्रकारच्या किडीवर नियंत्रण करता येत असल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत तालुका कृषी विभागातर्फे (आत्मा योजना) शेतकरी गटांना 360 यंत्रे वाटप केले. एस्सी, एनटी शेतकरी 90 टक्के, इतर शेतकरी गटांना 75 टक्के सुटीवर हे यंत्र देण्यात आले आहे.

 

तालुक्‍यातील अजय पिंपळकर मांगली, रवींद्र जीवतोडे पेवरा, प्रमोद गणफाडे पारोधी, हनुमान राणे मुधोली, सुनील उमरे नंदोरी यांच्यासह अन्य शेतकरी या यंत्राचा वापर करीत आहे. यामुळे कीड नियंत्रणात येत असून, फवारणीच्या खर्चात बचत होत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे यंत्र किडीचे पतंग आकर्षित करून कीड नियंत्रण करण्याचे काम करते. यंत्रामध्ये एक निळ्या रंगाचा एलईडी दिवा असतो. या सापळ्यात येऊन यंत्राच्या घमेल्यातील पाण्यात पडून किडीचे पतंग मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे पतंगाची पिढी नष्ट होऊन त्याचा प्रादुर्भाव कमी होतो.

किडीच्या प्रादुर्भावातून मुक्तता

प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या किडीनुसार ट्रॅप व लूर्स (कामगंध सापळा) वापरावा लागतो. हा प्रकाश सापळा 2 एकरपर्यंतच्या जमिनीतील किडीचे नियंत्रण करतो. पिकाच्या मधोमध हे यंत्र ठेवण्यात येते. पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 2 फूट उंच सापळा ठेवण्यात येत असल्याची माहिती सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक एस. सी. हिवसे यांनी दिली. तसेच या प्रकारच्या सापळ्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा. किडीच्या प्रादुर्भावातून मुक्तता मिळवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, कृषी सहायक साळवे, कृषी अधिकारी गाडेवार, मंडळ कृषी अधिकारी कोमटी यांनी केले आहे.

हेही वाचा : पुजारी पतीच्या मंत्रतंत्राला दूर सारून डॉक्‍टरांनी महिलेची केली सुखरूप प्रसूती...जुळ्यांना दिला जन्म

 

मजुरीच्या खर्चात बचत
या यंत्रामुळे पिकांवरील फवारण्या कमी झाल्या. मजुरीच्या खर्चात बचत होत आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
- अजय पिंपळकर,
एकता सेंद्रिय शेती शेतकरी गट, मांगली रै.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)