Video : लोकजागृतीत लीळाचरित्राचा महत्त्वाचा वाटा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

आतापर्यंत शके 1456 च्या आधीची पोथी उपलब्ध नाही असा अभ्यासकांचा दावा होता. मात्र, यात शके 1440, 1450, 1462 च्या प्राचीन पोथ्या संपादनात वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे फार अद्‌भुत साहित्यिक संपादन आणि संशोधन असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. 

नागपूर : महानुभाव पंथाच्या वाङ्‌मयाचा विचार करताना आद्यग्रंथ लीळाचरित्र सर्वज्ञांच्या आठवणीच्या आठवातून निर्माण झालेले अक्षरलेने आहे. बुधवारी (ता. 11) शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आद्यग्रंथ लीळाचरित्र गौरव सोहळा आयोजित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी पंडित माहीमभट्ट संकलित लीळाचरित्र ग्रंथप्रकाशनाबाबत संवाद साधला. 

 

हेही वाचा - विधानभवनात ज्ञानाचा खजिना खुला

 

लीळाचरित्र ग्रंथातील लीळांच्या माध्यमातून वाङ्‌मयीन सौदर्यांचे विशाल भांडार आपल्यापुढे उपलब्ध होणार आहे. स्वामींची निवेदन शैली, कथागर्भता आणि साधीसोपी भाषा सहजच हृदयाचा ठाव घेणारी आहे. त्यामुळे आजही लीळाचरित्र या ग्रंथाचे मोल निर्विवादपणे मान्य करावे लागते. श्रीचक्रधर स्वामींच्या लीळांचे परंपरेने साधकांना स्मरण घडत रहावे या हेतूने संत पंडित म्हाइभंटानी लीळाचरित्रांची निर्मिती केली. लीळाचरित्र हा मराठीतला आदयग्रंथ असून, तो आदय चरित्रग्रंथही आहे, असेही डॉ. वाटाणे म्हणाले. 

परमेश्‍वराविषयी नितांत श्रद्धा असताना भक्तियुक्त अंतः करणातून आकारास आलेल्या चरित्रातही किती पारदर्शकता आणि तटस्थता असू शकते याचा आदर्श वस्तूपाठ लीळाचरित्राच्या रूपाने पहायला मिळतो. केवळ चरित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे विवेचन करता येत नाही. ज्या दृष्टीकोनातून अभ्यासक या ग्रंथाचे संशोधन करतो त्यादृष्टीने अधिकाधिक वैशिष्ट्याची माहिती हा ग्रंथराज देतो. मराठी ललित गद्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा पहिला मान या पंथाकडे जातो. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा आधार म्हणजे लीळाचरित्र होय, असेही डॉ. वाटाणे म्हणाले.

 

जाणून घ्या - सराफा व्यावसायिकांत भीती, कशामुळे? वाचा...

 

लीळाचरित्रांतील महत्त्वाचे घटक

  • औरंगाबाद विद्यापीठात मोठ्या प्रमाणात महानुभाव साहित्याच्या पोथ्या संग्रहित असून, त्यांची संख्या पाचशेच्या घरात आहे. त्या अत्यंत जिर्णावस्थेत असून, त्यांचे संग्रहण व संरक्षण योग्य प्रकारे होणेही तितकेच गरजेचे आहे. 
  • दिल्ली येथे मुरारीमल्ल आश्रमात मोठ्या प्रमाणात हस्तलिखीते उपलब्ध आहेत. 
  • प्रस्तृत ग्रंथाच्या संपादनात शके 1440ची प्राचीन पोथी वापरली गेली आहे. एवढी प्राचीन पोथी यापूर्वीच्या कुठल्याच संपादनात वापरली गेली नाही. 
  • आतापर्यंत शके 1456 च्या आधीची पोथी उपलब्ध नाही असा अभ्यासकांचा दावा होता. मात्र, यात शके 1440, 1450, 1462 च्या प्राचीन पोथ्या संपादनात वापरल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे फार अद्‌भुत साहित्यिक संपादन आणि संशोधन असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. 
  • डॉ. म. रा. जोशी हे प्राचीन मराठी वाङ्‌मयाचे व्यासंगी साहित्यिक असून, ते महानुभाव पंथाच्या उपलब्ध साहित्याची ग्रंथसूची तयार करीत आहे. त्यात त्यांनी अडीच हजारांहून जास्त हस्तलिखितांची नोंद आतापर्यंत केली असून, त्यांचे कार्य वर्षभरात पूर्ण होईल. 

Image may contain: 1 person, sunglasses

लीळाचरित्र हा ग्रंथ नव्याने येणार 
लीळाचरित्र हा ग्रंथ नव्याने प्रसिद्ध होत आहे. आचार्य प्रवर नरेंद्रमुनी बाबा अंकुळनेरकर (रा. देवदत्त आश्रम, जाधववाडी, पुणे) यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे. 46 प्राचीन पोथ्यांवरून संपूर्ण मुरारीमल्ल पाठ प्रथमच सादर होत आहे. 
- प्रा. डॉ. राजेंद्र वाटाणे, 
मराठी विभाग प्रमुख, तायवाडे महाविद्यालय, कोराडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lilacharitra texts