बोगस बियाण्यांची लिंक खानदेशमार्गे गुजरातपर्यंत

तुषार अतकारे
मंगळवार, 25 जून 2019

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शिरपूर पोलिस व तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्तरीत्या प्रतिबंधित बियाण्यांची खेप पोहोचविणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचे गांभीर्य बघून ठाणेदार सतीश चवरे यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढले असता, बोगस बियाण्यांची लिंक खानदेशमार्गे गुजरातपर्यंत आढळून आले. त्यानुसार गांधीनगर येथील विपीन पटेल याला ताब्यात घेण्यासाठी शिरपूर पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले आहे.

प्रदीप पुनवटकर (वय 27), अरविंद शेडमाके (वय 35, दोघे रा. निमनी ता. झारी), राजेश भोयर (वय 40, रा. सोनुर्ली, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर), सतीश डाहुले (वय 40, रा. माथा, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर), प्रमोद बल्की (वय 25) व बाला बल्की (दोघे रा. हिरापूर, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर), सुभाष पाटील (रा. जळगाव) व विपीन पटेल (रा. गांधीनगर, गुजरात) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याशिवाय रविवारी रात्री राजुरा येथील प्रवीण ढेंगळे यालाही पोलिसांनी अटक केली होती. त्यातील डाहुले व ढेंगळे या दोघांच्या पोलिस कोठडीत 28 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
तीन संशयित कंपनीशी संबंधित
गुजरात, जळगाव व चंद्रपूर अशी प्रतिबंधित बियाण्यांची लिंक असून, ती चोरट्या मार्गाने वणी उपविभागात वितरित होताना दिसत आहे. या प्रतिबंधित बियाण्यांबाबत शेतकरी वर्गात चांगलीच प्रसिद्धी झाल्याने व त्यावर होणारा मजुरीचा खर्च कमी होत असल्याने शेतकरी आकर्षित होत आहेत. याचाच फायदा बियाणे कंपन्यांनी पोसलेले कर्मचारी उचलत आहेत. या प्रकारातही अटक करण्यात आलेले तीन संशयित हे बियाणे कंपनीशी निगडित आहेत.
लवकरच होणार उलगडा
या प्रकरणातील नऊपैकी सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर, जळगाव येथील सुभाष पाटील याच्या मागावरही पोलिस असून, गांधीनगर येथील मुख्य म्होरक्‍या विपीन पटेल याच्या अटकेकरिता शिरपूर पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले आहे. पटेलच्या अटकेनंतर महाराष्ट्रात बोगस बियाण्यांचा किती साठा पाठवण्यात आला आहे, याचा उलगडा होऊ शकेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Link to bogus seeds through Khandesh to Gujarat