दारू विक्रेत्याचा महिलांवर हल्ला

police
police

शिंदोला (यवतमाळ) : दारू पकडून पोलिस ठाण्यात जाणार्‍या महिलांवर दारू विक्रेत्यासह अन्य लोकांनी वाहन अडवून हल्ला चढविला. यात चार महिला जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी (ता. 8) रात्री साडेसातला कुरई येथे घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. महिला दिनाला घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रंजना वसंता ताजणे (वय 35), किरण सुमित काकडे (वय 37), वीणा हरी कोडापे (वय 38), छाया भैयाजी बलकी (वय 38, सर्व रा. ढाकोरी), अशी जखमी महिलांची नावे आहेत. रंजना ताजणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आठ टाके पडले. शिंदोला येथून जवळ असलेल्या कुरईनजीकच्या ढाकोरी येथे दुपारी चारला महिलांनी अवैध दारू पकडली. ती दारू घेऊन महिला चार चाकी वाहनाने रात्री साडेसातला शिरपूर पोलिस ठाण्याकडे निघाल्या. शिरपूर ते कोरपना रोडवर असलेल्या कुरई येथे त्यांची गाडी अडवून आठ ते दहा व्यक्तींसह अवैध दारू विक्रेत्याने हल्ला चढविला.

घाबरलेल्या महिलांनी आरडाओरड करीत पळ काढला. विक्रेत्यांनी महिलांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. महिलांची आरडाओरड बघून कुरई येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व दारूविक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याने प्रकरण आणखीच चिघळले. यावेळी दगडफेक करण्यात आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, ते येईपर्यंत तणावात वाढ झाली. रागाच्या भरात एक दुचाकी जाळण्यात आली. पोलिसांचे वाहन दिसताच दगडफेक करून काचा फोडण्यात आला. काही केल्या नागरिक शांत होण्याच्या मानसिकतेत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जात पोलिसांचे वाहन पलटी केले. पोलिसांनी संशयित आरीफ शेख याला ताब्यात घेतल्यानंतर तणाव काही प्रमाणात शांत झाला. वृत्तलिहेस्तोवर गुन्हा नोंद झाला नव्हता.  

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून वणी, शिरपूर, पांढरकवडा येथून  अतिरिक्त पोलिसांना पाचारण करण्यात आले. संशयिताला ताब्यात घेऊन नागरिकांना शांत करण्यात आला. पुढील तपास वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नाईक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार चवरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com