दारूतस्करीसाठी "झूम कार'चा फंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

वरोरा (जि. चंद्रपूर) : झूम कार ऍपद्वारे वाहन बूक करायचे. चालक नसल्याची संधी साधून त्या वाहनाचा वापर दारूतस्करीसाठी करायचा. हा प्रकार नागपुरातील काही युवकांकडून सुरू होता. मात्र, वरोरा पोलिसांनी मंगळवारी त्या युवकांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी पाच युवकांकडून 20 लाखांचा दारूसाठा जप्त केला. दारूतस्करीसाठी वापरण्यात आलेल्या या नवीन क्‍लृप्तीने पोलिसही चक्रावले.

चारचाकी वाहनाद्वारे दारूतस्करी केली जात असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नंदोरी टोलनाक्‍यावर ब्रिजा एमएच 43 बीजी 9619 व केवी एमएच 43 बीजी 7469 क्रमांकाची वाहने थांबवून चौकशी केली. तपासणीत वाहनांमध्ये दारूसाठा आढळून आला. यावेळी पाच युवकांना ताब्यात घेण्यात आले. दारू राजुरा येथे पोहोचविण्यात येत असल्याचे युवकांनी सांगितले. वाहनासंदर्भात चौकशी केली असता, युवकांनी दिलेली माहिती ऐकून पोलिसही चक्रावले.
आकाश शंकर गुप्ता (रा. नागपूर) व त्याच्या मित्रांनी झूम कार ऍपद्वारे नागपूर येथून वाहन बूक केले. या वाहनासोबत चालक येत नाही. त्यामुळे वाहनाचा वापर दारूतस्करीसाठी करण्याचा निर्णय झाला. एका वाहनात दारूसाठा भरायचा आणि दुसरे वाहन पायलट म्हणून वापरायचे ठरले. मात्र, पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
दुसऱ्या घटनेत एमएच 31 बीएक्‍स 654 क्रमांकाच्या दुचाकीमधून दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे, या दुचाकीमधील सीटच्या खाली आणि पेट्रोल टॅंकमध्ये दारू ठेवण्यासाठी विशेष कप्पा तयार करण्यात आला होता. यावेळी दारूतस्कर पळून गेला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: liquor smuggling by zoomcar