सुशिक्षितांच्या गांभीर्यावर प्रश्‍नचिन्ह; शहरवासींच्या तुलनेत ग्रामस्थ मतदानाबाबत साक्षर 

file photo
file photo

नागपूर : मतदानाबाबत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. या जनजागृतीने केवळ ग्रामस्थच गंभीर झाल्याचे मतदानाच्या टक्केवारीतून अधोरेखित झाले आहे. मतदान जनजागृतीबाबत निवडणूक आयोगाने शहरात मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला असला तरी येथील मतदार अजूनही मतदानाबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. एकूणच शिक्षणाबाबत मागे असल्याचे म्हणून ग्रामस्थांना हिणवले जात असले तरी लोकशाहीतील महत्त्वाच्या कर्तव्याबाबत सुशिक्षितांचे पितळही यानिमित्त उघडे पडले आहे. 
राज्य विधानसभेसाठी जिल्ह्यातील काटोल, रामटेक, कामठी, हिंगणा, उमरेड, सावनेर, दक्षिण-पश्‍चिम नागपूर, दक्षिण, पूर्व, मध्य, पश्‍चिम व उत्तर नागपूर मतदारसंघांत सोमवारी निवडणूक पार पडली. बाराही मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पुढे आली आहे. जिल्ह्यात एकूण 41 लाख 71 हजार मतदारांपैकी 23 लाख 85 हजार 483 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 42.81 टक्के नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविली. केवळ 57.19 टक्के मतदान झाल्याने विविध पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. 
मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्यांत शहरातील मतदारांची संख्या अधिक आहे. शहरातील 50.68 टक्के नागरिकांनी मतदान केले. 49.32 टक्के नागपूरकरांनी मतदानाकडे पाठ फिरविली. ग्रामीणमध्ये 64.51 टक्के नागरिकांनी मतदान केले. 35.49 टक्के नागरिकांनी पाठ फिरविली. त्यामुळे शहरातील सहाही मतदार संघांतील मतदारांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदार मतदानाबाबत अधिक साक्षर असल्याचे दिसून येत आहे. 
शहरवासींना पछाडण्याची परंपरा कायम 
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ग्रामीणमधील सहाही मतदार संघांतील एकूण टक्केवारी शहराच्या तुलनेत अधिक होती. मागील निवडणुकीत ग्रामीण भागात 67.20 टक्के मतदान झाले. शहरात केवळ 54.66 टक्के मतदान झाले होते. मतदानात शहरवासींना पछाडण्याची परंपरा ग्रामस्थांनी या निवडणुकीतही कायम राखली. 
ग्रामीण व शहरी भागात झालेले मतदान 
ग्रामीण मतदार संघ 
मतदारसंघ एकूण मतदार मतदान करणारे मतदार टक्केवारी 
काटोल 2,71,893 1,88.800 69.44 
सावनेर 3,10,729 2,10,779 67.83 
हिंगणा 3,76,636 2,26,188 60.05 
उमरेड 2,84,657 1,97,479 69.37 
कामठी 4,39,875 2,58,517 58.77 
रामटेक 2,78,279 1,83,925 66.09 
एकूण 19,62,069 12,65,688 64.51 

शहरातील मतदारसंघ 
दक्षिण-पश्‍चिम 3,84,094 1,91,531 49.87 
दक्षिण नागपूर 3,82,338 1,92,314 50.30 
पूर्व नागपूर 3,71,893 1,98,209 53.30 
मध्य नागपूर 3,24,158 1,64,166 50.64 
पश्‍चिम नागपूर 3,62,274 1,78,337 49.23 
उत्तर नागपूर 3,84,594 1,95,238 50.76 
एकूण 22,09,351 11,19,795 50.68

सामाजिक संस्था, एनएसएसचे विद्यार्थी, बचतगटांच्या सहकार्याने प्रशासनाने मतदारांना मतदानाचे आवाहन केले. विविध उपक्रम राबवित मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे एवढे मतदान झाले; अन्यथा यापेक्षाही कमी टक्केवारीची शक्‍यता होती. 
- रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com