साहित्यिकांनी नवमाध्यमे स्वीकारावीत - श्रीराम पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

नागपूर - "सोशल मीडियावरील नव्या पिढीचे लेखन आपण कचरा समजत असलो, तरी जगाने ते स्वीकारले आहे; मात्र या माध्यमांचे वय फार कमी आहे, ती अपरिपक्व आहेत. त्यामुळे ते नाकारण्यापेक्षा त्यांना परिपक्व करण्यासाठी प्रगल्भ व अनुभवी साहित्यिकांनीच आता नवमाध्यमे स्वीकारण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन "सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी आज येथे केले. विदर्भ साहित्य संघाच्या 94 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मनोहर म्हैसाळकर होते. साहित्य संघाचे वाङमय पुरस्कारही या वेळी प्रदान करण्यात आले. श्रीराम पवार म्हणाले, "जागतिकीकरण माणसाचे जगणे कवेत घेईल, असे गेली तीन दशके आपण ऐकत आलोय; मात्र 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात नेमका उलटा प्रवास सुरू झाला. उजव्या वळणाचा हा टोकाचा राष्ट्रवाद साहित्यात प्रतिबिंबित करता येईल का, याचा विचार साहित्यिकांनी केला पाहिजे.' फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपसारख्या नवमाध्यमांमुळे "अन्न, वस्त्र, निवारा आणि डाटा' ही माणसाची गरज होऊन बसली.' "छापील साहित्यातून व्यक्त होणाऱ्यांना चारशे वर्षांचा वारसा आहे; मात्र या नवमाध्यमांना असा कुठलाच वारसा नाही. तरी त्यांच्याच हातात भविष्याची सूत्रे आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचायचे असेल, तर अनुभवी साहित्यिकांनाच या माध्यमांचा स्वीकार करावा लागेल,' असेही ते म्हणाले.

Web Title: Literary new media accepted