लोकशाहिरांचे साहित्य यावे इंग्रजी भाषेत

file photo
file photo

नागपूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य शोषित समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या साहित्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. भुकेल्यांच्या पोटात क्रांतीची आग पेटवण्यासाठी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या 80 वर आहे. त्यांचे आयुष्य हे एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसे आहे. तर जगाला संदेश देताना अण्णा भाऊंनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेले "जग बदल घालुनी घाव... सांगुनी गेले मला भीमराव...' हे स्फूर्तिगीत संघर्षाची प्रेरणा देणारे ठरले. लोकशाहीर अण्णा भाऊंचे मराठीतील साहित्य इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याबाबत राज्य शासन उदासीन आहे. मराठी भाषेतील केवळ एक ग्रंथ प्रकाशित करून जबाबदारी पार पाडल्याचा देखावा शासन करीत आहे.
अण्णा भाऊंच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने शोषणाच्या विरोधातील त्यांच्या लेखणीतील सुरांवर ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांनी "सकाळ'शी संवाद साधला. शोषित समाजाला जाणीवपूर्वक दूर ठेवणाऱ्या इथल्या व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या साहित्याचे प्रवर्तक म्हणून अण्णांचे नाव पुढे आहे. अण्णा भाऊंच्या साहित्याचे मर्म संघर्ष. कामगार चळवळीत कामगारांचे हलाखीचे जगणे, दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार अनुभवले. जे अनुभवले तेच साहित्यात त्यांनी मांडले. "फकिरा' आणि "वारणेचा वाघ' कादंबऱ्या खूप गाजल्या. "फकिरा'ला शासनाचा पुरस्कारदेखील मिळाला. रशिया, फ्रान्स, जर्मनी, युगोस्लाविया इत्यादी 27 देशांत अण्णा भाऊंचे साहित्य भाषांतरित झाले. मात्र राज्य शासन मराठीसह इंग्रजी भाषेत साहित्य प्रकाशनाबाबत उदासीन आहे, असे वानखेडे म्हणाले.
लहानपणी दिवसभर रानात हिंडणे, मित्रांसमवेत पाखरं मारत हिंडणाऱ्या अण्णा भाऊंनी जातिद्वेषामुळे गाव सोडले. मुंबई गाठली. मुंबईत चाळीत अण्णा काम करू लागले. पेटी, ढोलकी, बुलबुल तरंग शिकले. माटुंग्यातील झोपडीत राहून अण्णा गिरणीत काम करू लागले. तिथे कामगार चळवळीशी संबंध आला. या चळवळीतच कॉम्रेड श्रीपाद डांगे या राजकीय प्रवाहांतील लोकांशी ओळख झाली. अण्णा कम्युनिस्ट विचारांकडे झुकले. पिंड शाहिराचा होता. म्हणूनच अण्णा म्हणतात, "आज पृथ्वीचा खरा आधार कोण? खऱ्या अर्थाने पृथ्वी मृत्यूला सामोरे जाणाऱ्या श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.' अशा शोषित समाजाला दिशा देणाऱ्या अण्णांचे समग्र वाङ्‌मय दीड दशकापूर्वी महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळाने प्रकाशित केले होते; परंतु अल्पावधीत ही आवृत्ती संपली. सरकारी मुद्रणालयात अण्णा भाऊंचे साहित्य उपलब्ध नसतानादेखील शासनाकडून अण्णांचे समग्र वाङ्‌मय पुनर्मुद्रित करताना हात आखडता घेतला जातो. मागील पाच वर्षांत केवळ एक ग्रंथ पुनर्मुद्रित केला.
पोटाची भूक भागविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तशी बुद्धीची भूक भागविण्यासाठी ज्ञान किंवा साहित्याची गरज असते, असा विश्‍वास लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा होता. यामुळे शासनाने अल्पदरात अण्णांचे साहित्य समाजापर्यंत पोहोचवावे. तसेच इंग्रजी भाषेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रकाशन समितीमार्फत साहित्य प्रकाशित करावे.
- चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ साहित्यिक तसेच अभ्यासक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com