तीन वर्षांत 57 जणांना जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर : सुपर स्पेशालिटीचा हृदय विभाग असो, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी किंवा किडनी विभाग, पाच राज्यातील गरिबांसाठी "सुपर' वरदान ठरले आहे. मागील अडीच वर्षात येथील नेफ्रोलॉजी विभागात 57 व्यक्‍तींना किडनी प्रत्यारोपणातून जीवदान मिळाले. विशेष म्हणजे यातील 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिला किडनी दानकर्त्या आहेत. 

नागपूर : सुपर स्पेशालिटीचा हृदय विभाग असो, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी किंवा किडनी विभाग, पाच राज्यातील गरिबांसाठी "सुपर' वरदान ठरले आहे. मागील अडीच वर्षात येथील नेफ्रोलॉजी विभागात 57 व्यक्‍तींना किडनी प्रत्यारोपणातून जीवदान मिळाले. विशेष म्हणजे यातील 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिला किडनी दानकर्त्या आहेत. 
दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने जीवन आणि मृत्यूच्या नाजूक वळणावर उभ्या असलेल्या दारिद्य्ररेषेखालील रुग्णांसाठी सुपर आशेचा किरण ठरत आहे. किडनी प्रत्यारोपणात पहिले सरकारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आघाडीवर आहे. 57 जणांना आप्तेष्टांकडून मिळालेल्या अवयवामुळे किडनी प्रत्यारोपणाचा उच्चांक गाठला आहे. यात या आठवड्यात दोघांची भर पडली. 
किडनी विकारामुळे मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या दोघांनाही मातेने किडनी दान केले. मातेकडूनच नवजीवन मिळाले. राहुल हेलवाडे (वय 28 ) आणि उमेश हरीणखेडे (वय 38) असे आईकडून किडनी मिळालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. त्यापैकी राहुल याला आई चंद्रकला यांनी किडनी दान करीत नवजीवन दिले. तर उमेशला त्याची आई फुलनदेवी यांनी किडनी दिली. सुपरमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या किडनी प्रत्यारोपणात अवयव प्रत्यारोपण समन्वयक डॉ. मेहराज शेख, डॉ. रितेश बनोदे, प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलोकर, डॉ. चारूलता बावनकुळे, डॉ. निखिल जैन, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. वंदना आदमाने, डॉ. विशाल रामटेके यांच्यासह पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. संजय पराते, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय सोनुने, डॉ. महाजन यांचा मोलाचा वाटा आहे. 
डायलिसिसवरचे आयुष्य 
जानेवारीपासून या दोघांनाही गंभीर किडनीचा त्रास सुरू झाला होता. राहुल मूळचा चंद्रपूरचा. नुकताच पदवी उत्तीर्ण झाला. लहानपणापासूनच तो किडनी विकाराने ग्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. तर गोंदिया जिल्ह्यात वाहनचालक असलेला उमेशदेखील डायलिसीसवर जगत होता. विशेष म्हणजे मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या मुलांसाठी किडनीचे दान करणाऱ्या दोन्ही मातांनी वयाची साठी गाठली आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lives to 57 people in three years