esakal | चंद्रपूर जिल्ह्यातील आमडी (बेगडे) शेतशिवारात टोळधाडीचे आक्रमण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

चंद्रपूर जिल्ह्यातील आमडी (बेगडे) शिवारातही आता टोळधाडीने आक्रमण केले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता या टोळधाडीचे वेळीच निराकरण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आमडी (बेगडे) शेतशिवारात टोळधाडीचे आक्रमण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या आमडी बेगडे येथील शेतकऱ्यांच्या शेतात टोळधाडने आक्रमण केले आहे. या टोळधाडने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शेतीच्या हंगामाअगोदर टोळधाडीचे पिकावर आक्रमण झाल्याने आमडी परिसरातील शेतकरी पुरता हादरला आहे.

आमडी येथील शेतकरी शालीक विटाळे, रत्नाकर विटाळे, राजू पाटील झाडे, विजय नामदेव शेंडे, अनंता गलांडे, मोहन झाडे, अमृत गाठे, राजू झिकार, नंदकिशोर चदनखेडे या शेतकऱ्यांच्या शेतात टोळधाडने आक्रमण केले आहे.

खबरदारी घेण्याचे आवाहन

या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता 1 जूनला कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. राठोड, डॉ. विनोद नागदेवते, उपविभागीय कृषी अधिकारी सिंदेवाही, वरोरा यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली असता टोळधाडीचे अल्प प्रमाण असून, ही टोळधाड भटकून आली तेव्हा शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तिला हाकलून लावण्याचे व नष्ट करण्यासाठी नियंत्रण व उपाय सांगून योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : राजाने बांधले क्रीडांगण, लोकांनी केला त्याचा बाजार! एका ही कहाणी...

शेतात मशाली पेटवून धूर करा
टोळधाड हिरवी पाने, फुले, फळे, बिया यांचा फडशा पाडतात. खरीप हंगामातील पिकांनाही या किडीचा धोका होण्याची शक्‍यता आहे. टोळ धाड आल्यास समूहाच्या वाटेवर 2 ते 3 फूट खोल चर काढून, शेतात मशाली पेटवून आणि टायर जाळून धूर करून तसेच थाळी वाजवून टोळ नियंत्रणात आणू शकतो. याबाबत कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
- ज्ञानदेव तिखे
कृषी अधिकारी, चिमूर