दावे-प्रतिदाव्यांसह मताधिक्‍याचा दावा

दावे-प्रतिदाव्यांसह मताधिक्‍याचा दावा

नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. यातून भाजप-सेना युतीचे शिवसेना उमेदवार कृपाल तुमाने व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांच्यातील ही लढत तुल्यबळ व अटीतटीची असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सर्वच विधानसभा मतदारसंघातून १० हजारांपर्यंतचे मताधिक्‍य त्या त्या पक्षाच्या उमेदवारास मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही जनतेला व नेत्यांनाही मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाची उत्सुकता लागली आहे.

लागल्या लाखोंच्या पैजा!
चंद्रशेखर श्रीखंडे, विजय पांडे 
सावनेर विधानसभा मतदारसंघ तालुके : सावनेर, कळमेश्‍वर 
कळमेश्‍वर, सावनेर :
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर सावनेर मतदारसंघात निवडणुकीच्या निकालाबाबत विविध चर्चांना ऊत आला आहे. ‘कोण बाजी मारेल’ यावर खमंग चर्चा सुरू असून लाखोंच्या पैजा लागल्या आहेत. कृपाल तुमाने यांना  सावनेर मतदारसंघातून ‘झुकते माप’ दिल्याची चर्चा जोरात आहे. 

सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची एकहाती सत्ता आहे. कळमेश्वर व सावनेर तालुक्‍यात लोकसभेचे एकूण ३६४ बूथ आहेत. यात नऊ जिल्हा परिषद सर्कल व चार नगरप रिषदांचा समावेश असून या सर्व बूथवरून काँग्रेस व सेनेचे उमेदवार समसमान चालण्याची चर्चा आहे. मात्र, असे असतानाही भाजपचे सावनेर विधानसभाप्रमुख  प्रकाश टेकाडे यांनी युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांना १५ हजारांची लीड मिळेल, असा दावा केला आहे. शिवसेनेचे कळमेश्‍वर तालुकाप्रमुख प्रकाश ठाकूर म्हणाले, मतदानापूर्वी झालेली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेने कार्यकर्त्यांना नवे बळ मिळाले होते, यामुळे शिवसैनिक जोमाने कामाला लागले होते. काँग्रेसकडून किशोर गजभिये यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी फार कमी अवधी मिळाला हे खरे आहे. मात्र, गजभिये यांना विजयी करण्यासाठी विद्यमान आमदार सुनील केदार यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला. सर्वसामान्य कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बळावर  प्रचार यंत्रणा राबविली. काँग्रेसचे किशोर गजभिये यांना सावनेर मतदारसंघातून यावेळी  विजयासाठी निश्‍चित असलेली आघाडी मिळेल असा विश्‍वास काँग्रेसचे सावनेर तालुकाध्यक्ष सतीश लेकुरवाळे यांनी व्यक्त केला. 

सावनेर विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्व ग्रामपंचायतील मतदानाचा आकडा वाढला आहे. लोक बदलासाठी उत्सुक आहेत. अर्थातच काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये विजयी होतील. त्यांना २५ हजारांची आघाडी मिळेल. 
- अनिल राय, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस

कृपाल तुमाने यांचा कार्यकाळ समाधानकारक होता. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेसाठी काम केले. यामुळे रामटेकमध्ये शिवसेनेचा झेंडाच फडकणार. 
- तुषार उमाटे

***********************************************

सेनेच्या विजयमार्गात काँग्रेसचा अडसर
हिंगणा विधानसभा मतदारसंघ  तालुके : हिंगणा, नागपूर ग्रामीण  
अजय धर्मपुरीवार
हिंगणा -
 रामटेक लोकसभा मतदारसंघातील हिंगणा विधानसभा क्षेत्रात सेना-भाजप युतीचे उमेदवार कृपाल तुमाने व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांच्यात तुल्यबळ लढत झाली. काँग्रेसचा नवखा उमेदवार असतानाही सेनेच्या उमेदवाराला चांगलाच घाम फोडला. सेना व भाजप आणि तिकडून विजयाचा दावा केला जात असला तरी सेनेचा विजयाचा मार्ग मात्र काँग्रेसने खरतड केला आहे.

हिंगणा विधानसभा क्षेत्रात वाडी, बुटीबोरी, हिंगणा, वानाडोंगरी, नीलडोह, डिगडोह या शहरी भागाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील मतदारांची आकडेवारी पाहता शहरी भागातील मतदारांचा पल्ला भक्कम आहे. हिंगणा तालुक्‍यातील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमधील संख्याबळ जवळपास सारखेच आहे. हिंगणा विधानसभा क्षेत्रात भाजप  आमदार समीर मेघे यांनी विकासकामे मोठ्या प्रमाणात केली. भाजपने सेनेसाठी किती  प्रामाणिकपणे काम केले यावर विजयाचे भाकीत अवलंबून असल्याची प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख नंदू कनेर यांनी दिली. दुसरीकडे नागपूर ग्रामीण तालुक्‍यातही भाजपचा प्रभाव आहे. यामुळे तेथूनही शिवसेना उमेदवाराला आघाडी मिळणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.

काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी विधानसभा क्षेत्रात लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांशी संपर्क ठेवून प्रचार सभेत सभेत चांगला जोर मारला. ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या नाराजीचा सूर त्यांनी प्रचारात आवळला. काँग्रेसचे बाबा आष्टणकर व कुंदा राऊत यांनीही काँग्रेस उमेदवारासाठी  परिश्रम घेतले. 

रामटेक लोकसभा मतदारसंघातून जवळपास एक लाखाचे मताधिक्‍याने घेऊन काँग्रेसचा उमेदवार लोकसभेत जाईल. त्यांना हिंगणा मतदारसंघातून चांगली आघाडी मिळेल यात शंका नाही. 
- प्रवीण खाडे, हिंगणा तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

विधानसभा मतदार क्षेत्रात जवळपास सेना उमेदवाराला २५ हजारांची लीड मिळेल. आमदार समीर मेघे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. याशिवाय मोदी सरकारने केलेली कामांचा प्रभाव  आहेच. 
- विशाल भोसले, हिंगणा भाजप तालुकाध्यक्ष

***********************************************
कुणाचा दावा ठरणार फोल
रामटेक विधानसभा मतदारसंघ  तालुके :  रामटेक, पारशिवनी 
वसंत डामरे, रुपेश खंडारे
रामटेक, पारशिवनी -
 गुरुवारी २३ मे रोजी लोकसभेच्या मतदानाची मोजणी होईल. मात्र, मतदान झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून विधानसभा क्षेत्रात आम्हालाच आघाडी मिळेल असा दावा करण्यात आला आहे. मतमोजणी झाल्यानंतरच कोणाच्या दाव्यातील हवा फुस्स होते ते कळेल.

रामटेकचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी कृपाल तुमाने यांना कमीत कमी दहा हजार मतांची आघाडी मिळवून देणारच असा दावा केला. प्रचारात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. मोदींना  पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने मन बनवून मतदान केल्याचे ते म्हणाले. राज्य खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी जनतेने  शिवसेना उमेदवाराला पसंती दिली आहे. पारशिवनी, कन्हान  भागातून आघाडी मिळेल, असे सांगितले. भाजपचे पारशिवनी तालुकाध्यक्ष अशोक कुथे यांनी पारशिवनीमधून तुमाने यांना तीन हजारांची लीड मिळेल  असा दावा केला. 

काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून रामटेक विधानसभा क्षेत्रातून किशोर गजभिये यांना १० हजारांचे मताधिक्‍य मिळेल असे मत व्यक्त केले. यावेळी आदिवासी भागातील जनतेने बसपकडे पाठ फिरवून काँग्रेसला चांगली मते दिली आहेत. संपूर्ण विधानसभा क्षेत्रात १२  हजारांपर्यंत लीड मिळणार असल्याचे काँग्रेसचे उदयसिंग यादव  यांनी  सांगितले.  प्रहार संघटनेचे रमेश कारेमोर यांनी, रामटेक हा काँग्रेसचा गड आहे. मागील पाच वर्षांत अल्पसंख्याक, एससी, एसटी जातीतील लोक कंटाळले आहेत, त्यांच्यात नाराजी आहे. रामटेक शहरातूनच गजभिये यांना पाच हजारांचे मताधिक्‍य मिळेल. काँग्रेसचा उमेदवार उच्च शिक्षित असल्याने त्याचा फायदा नक्कीच होणार असल्याचे मत व्यक्त केले.  

काँग्रेससाठी यावेळी अनुकूल वातावरण होते. काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचता आले नसले तरीही रामेटक विधानसभा क्षेत्रात पंधरा हजारांची आघाडी मिळेल.
- डॉ. अमोल देशमुख, राष्ट्रीय समन्वयक, संशोधन विभाग, काँग्रेस

आम्ही घेतलेल्या नुक्कड सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. वातावरण युतीला पोषक होते. विधानसभेत तुमाने साहेबांना दहा हजारांची आघाडी मिळेलच. शहरातही आम्ही बरोबरीत राहू.
- संजय मुलमुले, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

***********************************************
जादा मतदानाचा फायदा कुणाला?
उमरेड विधानसभा मतदारसंघ  तालुके : उमरेड, कुही, भिवापूर
सतीश तुळस्कर, दिलीप चव्हाण, अमर मोकाशी 
उमरेड, कुही, भिवापूर -
 रामटेक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून उमरेडचा उल्लेख केला जातो. तीन तालुके असलेल्या या विधानसभा क्षेत्रात यावेळी सर्वाधिक मतदान झाले आहे. यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला मिळणार अशी चर्चा सध्या संपूर्ण उमरेड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. 

उमरेड विधानसभा मतदारसंघात आमदार सुधीर पारवे यांचे पारडे चांगलेच जड आहे. काँग्रेसने उमरेड विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. भिवापूर भाजपचे शहराध्यक्ष आनंद गुप्ता म्हणाले, तुमाने यांनी केलेली विकासकामे जनता विसरली नाही. यामुळे त्यांना तालुक्‍यातून मताधिक्‍य मिळेल. शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलाश कोमरेल्लीवार यांनी कृपाल तुमाने यांना भिवापूरमधून आघाडीवर असेल असे मत नोंदविले. 

भिवापूरचे माजी नगराध्यक्ष लव जनबंधू यांनी काँग्रेसच्या प्रचारात जनतेचा उत्साह बरेच काही सांगणारा असे मत नोंदविले. कुही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उपासराव भुते यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये आघाडी घेणार असल्याचे मत नोंदविले. यासाठी त्यांनी त्यांचा प्रशासकीय अनुभवाचा दाखला दिला आहे. कुही तालुक्‍यातील सामाजिक कार्यकर्ते विनय गजभिये यांच्या मते उच्च शिक्षित व माजी सनदी अधिकारी असलेल्या काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांना जनतेने पसंती दर्शविली असून त्यांना निश्‍चित व निर्णायक आघाडी मिळेल असे मत नोंदविले. रामटेक लोकसभा क्षेत्रातील आंबेडकरी मतदारांनी वंचित आघाडी, बसप व इतर उमेदवारांना दूर सारत काँग्रेसला मतदान केले असल्याचा दावा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जोगेंद्र सरकारे यांनी केला. 

लोकसभा क्षेत्रातील कोणत्याही विधानसभा क्षेत्रात गेल्यावर आम्ही विचारायच्या आधीच जनता स्वतःहून सांगते की, किशोर गजभिये निवडून येतील. इतक्‍या मोठ्या प्रमाणात मतदान काँग्रेसला झाले आहे. 
- संजय मेश्राम, उमरेड विधानसभाप्रमुख

रामटेक लोकसभा क्षेत्रातील पाच आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व जनता यांनी युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्यासाठी भरपूर मदत केली. उमरेडमधून त्यांना विक्रमी आघाडी मिळेल. 
- सुधीर पारवे, आमदार, उमरेड

 ***********************************************

राजकीय दावेदारीत कोण आघाडीवर?
काटोल विधानसभा मतदारसंघ  तालुके : काटोल, नरखेड
सुधीर बुटे, मनोज खुटाटे 
काटोल, जलालखेडा -
 काटोल मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कमळ फुलल्याने भाजपची ताकद वाढली. आतापर्यंत मागे राहणारे भाजपचे कार्यकर्ते समोर आल्याने काटोल विधानसभा मतदारसंघातून कृपाल तुमाने यांची बाजू सरस ठरणार आहे. अनिल देशमुख यांचा जनसंपर्क, झुंझार प्रचार यामुळे मतदानात उचल घेतल्याची माहिती ग्रामीण मतदारांकडून चर्चेत पुढे आली.

काटोल पंचायत समितीचे सभापती व भाजपचे नेते संदीप सरोदे यांना काटोलमधून तुमाने यांना २० हजारांहून अधिक मताधिक्‍य राहणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. मोदींचा देशभर प्रभाव कायम असल्याने तुमाने यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावा चरणसिंग ठाकूर यांनी केला. नरखेड युवासेना प्रमुख ललित खंडेलवाल यांनी तुमाने हेच सरशी साधणार असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी युवकांत मोदींची असलेली प्रतिमा फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. 

दुसरीकडे काटोल तालुक्‍यासह नरखेड, मोवाड, व्याहाड या भागांतून किशोर गजभिये यांना मताधिक्‍य मिळेल, असे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी सांगितले. या सरकारने शहरी भागाला महत्त्व दिले. ग्रामीण भागासाठी विकासाचा कोणताही कार्यक्रम नसल्याने शेतकरी व ग्रामीणांना फारसा लाभ झाला नाही. यामुळे या सरकारविषयी ग्रामीण आपुलकी राहिली नाही. यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा लाभ मिळेल, असे मत काटोल बाजार समितीचे सभापती बाबा शेळके यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com