चौकीदारातर्फे डीव्हीआर चोरीची तक्रार

file photo
file photo

उमरेड/नागपूर : उमरेड विधानसभाक्षेत्रातील "स्ट्रॉंग रूम'मधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरीप्रकरणी 12 दिवसांनतर अखेर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटीआयमधील चौकीदार बंडू महादेव नखाते (वय 30, तास कॉलनी, तालुका भिवापूर) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे उमरेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॉंग्रेसकडून हा मुद्दा उचलण्यात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिलला झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेड विधानसभाक्षेत्रांतर्गत शहरातील शासकीय आयटीआयच्या तंत्रविज्ञान इमारतीत स्टॉंग रूमची उभारणी करण्यात आली होती. तिथे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे व एलसीडी टीव्ही तथा डीव्हीआर बसविण्यात आले होते. त्यापैकी 2 एलसीडी टीव्ही व एक डीव्हीआर मशीन चोरट्यांनी चोरली. 13 तारखेलाच सर्व साहित्य चोरून नेल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून 15 तारखेला सामान चोरी गेल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात येते. प्रशासनकडून 26 तारखेपर्यंत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. उलट पोलिस तपास करीत असून त्यानंतरच कारवाई करणार असल्याने रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले होते. डीव्हीआर मशीन महत्त्वपूर्ण असून ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप कॉंग्रेस उमदेवार किशोर गजभिये यांनी शुक्रवारला केला होता. या प्रकरणाची चौकशी करून सहायक निवडणूक अधिकारी जगदीश लोंढे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या आरोपामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळेच शनिवारला तडकाफडकी चौकीदाराला समोर करून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. चौकीदार नखाते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 ते 15 एप्रिलदरम्यान 9 वाजताच्या आसपास आयटीआयच्या तंत्रविज्ञान इमारतीचे प्रवेशद्वार उघडे असल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दोन एलसीडी टीव्ही व एक डीव्हीआर असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अखेर प्रशासनाला गवसली आयडिया!
स्ट्रॉंग रूम निवडणूक विभागाच्या नियंत्रणात होते. मात्र, सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांकडे होती. निवडणूक विभागाच्या नियंत्रणात स्ट्रॉंग रूम असल्याने पोलिस स्वत:हून तक्रार दाखल करण्यास तयार नव्हते. तर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हात वर केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करणारा अडचणीत येण्याची शक्‍यता असल्याने कुणीही तक्रार देण्यास तयार नव्हता. प्रकरण उडवून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, माध्यमांमध्ये प्रकरण येताच कॉंग्रेसकडून मुद्दा उचलत वरिष्ठ पातळीवर तक्रार केली. साहित्य चोरी गेल्याची तक्रार आवश्‍यक आहे, असे वरिष्ठ पातळीवर सूचना येताच तडकाफडकी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरण तक्रार दाखल करणाऱ्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शेकणार असल्याने प्रशासनाने युक्तीने चौकीदारास समोर केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com