"त्या' दिवशी चौकीदार कामावरच नव्हता

file photo
file photo

उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला नवीन वळण येण्याची शक्‍यता आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातही यावर चर्चा झाली असून, उमरेड एसडीओकडून नव्याने खुलासा मागितल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमरेड विधानसभा क्षेत्राअंतर्गत शहरातील शासकीय आयटीआयच्या तंत्रविज्ञान इमारतीत स्टॉंग रूमची उभारणी केली होती. तिथे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही व एलसीडी टीव्ही तथा डीव्हीआर बसविले होते. त्यापैकी दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर मशीन चोरट्यांनी चोरली. 13 तारखेलाच साहित्य चोरून नेल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून 15 तारखेला सामान चोरी गेल्याचे सांगण्यात येते. प्रशासनकडून 26 तारखेपर्यंत पोलिसात दाखल केली नव्हती. प्रसारमाध्यमांमध्ये याची माहिती येताच पोलिस व महसूल प्रशासनात खळबळ उडाली. तडकाफडकी 27 तारखेला तक्रार दाखल करण्यात आली.
आयटीआयचे चौकीदार बंडू महादेव नखाते (30, रा. तास कॉलनी, तालुका भिवापूर) याला समोर करण्यात आले. 13 तारखेला बंडू नखाते कामावर नव्हता. तो मांढळला होता. रात्री भिवापूरला परत आल्याची माहिती बंडूने "सकाळ'चे प्रतिनिधी सतीश तुलसकर यांच्याशी बोलताना दिली. त्यामुळे पोलिस व महसूल यंत्रणेने एकमेकांना वाचविण्यासाठी चौकीदाराला समोर केल्याचे स्पष्ट होते.
16 तारखेला उमरेड पोलिसांनी बडू नखाते, गजनान सोनसरे, संजय बांडाने व प्रकाश सहारे यांना चार तास बसवून ठेवले. त्यानंतर 25 ला सुद्धा त्यांची चौकशी केली. सर्वांना 21 तास बसवून ठेवल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणूजे 13 तारखेलाच सकाळी नऊ वाजता पोलिस सुरक्षा हटविली. ही सुरक्षा हटविण्याचे आदेश कुणी दिले? यावर कुणीही बोलण्यास तयार नाही. आयटीआयचे प्राचार्य चंद्रशेखर राऊत यांना विचारणा केली असताना त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.  
स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्ही नव्हते?
सीसीटीव्ही लावण्याचे कंत्राट नागपूरच्या एकाच्या कंपनीस दिले होते. त्यांनी उमरेडच्या व्यक्तीस हे काम (पेटी कॉंट्रॅक्‍ट) दिले. संबंधित कंत्राटदाराने स्ट्रॉंगरूमची जबाबदारी असलेले नायब तहसीलदार पागोटे यांना अनेकदा फोन केला. मात्र, त्यांनी प्रतिसादच दिला नसल्याचे माहिती आहे. नियमानुसार स्ट्रॉंग रूममध्ये हे सीसीटीव्ही लावणे आवश्‍यक होते. एसडीओ जगदीश लोंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या अहवालानुसार डीव्हीआर हा स्ट्रॉंगरूम परिसरातील सीसीटीव्हीशी संबंधित होता. स्ट्रॉंग रूमच्या आतील शूटिंग सुरक्षित आहे. यामुळे स्ट्रॉंगरूममधील आतील भागात सीसीटीव्ही लावले नसल्याची शंका निर्माण केली जात आहे.  
जिल्हाधिकारी येणार अडचणीत?
डीव्हीआर चोरी प्रकरणातही महसूल विभागाशी भूमिका संशयास्पद आहे. एसडीओ जगदीश लोंढे यांनी घटनेची कोणतीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नसल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण योग्यरित्या न हाताळल्यास ते अडचणीत येणार असल्याचे जाणकार सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com