डीव्हीआर चोरला एक; चोरट्यांनी परत केले दोन

file photo
file photo

उमरेड : उमरेड विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम परिसरातून एक डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) चोरीला गेला असताना चोरट्यांनी दोन डीव्हीआर घटनास्थळी आणून ठेवले. दोन एलसीडी स्क्रीनही त्यांनी चोरल्या होत्या. त्या मात्र परत केलेल्या नाही. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक उद्या रविवारी तपासणी करण्यासाठी येणार आहे. त्याच्या नेमक्‍या आदल्या दिवशी डीव्हीआर सापडल्याने शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उमरेड विधानसभा क्षेत्रांतर्गत येथील शासकीय आयटीआयच्या परिसरात स्टॉंग रूम तयार करण्यात आले होते. येथे लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर व दोन एलसीडी स्क्रीन अज्ञान चोरट्यांनी चोरून नेले. हे प्रकरण चांगलेच गाजले. कॉंग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी या प्रकरणाची मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. चोरीच्या 12 दिवसानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिसांनी चौकीदाराला समोर केले. विशेष म्हणजे ज्या चौकीदाराकडून फिर्याद घेण्यात आली, तो घटनेच्या दिवशी कामावरच नव्हता. शासकीय कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी चौकीदाराला समोर करण्यात आल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या आठ दिवसानंतरही पोलिसांना चोरटा गवसला नाही. यामुळे प्रशासन चांगलेच हैराण झाले होते. तीन मेच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्‍तीने चोरीला गेलेले डीव्हीआर आयटीआय इमारतीच्या परिसरात आणून ठेवल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. आज शनिवारला पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपविभागीय पोलिस अधिकारी पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे, पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे, श्रीकांत एलसीबीचे पोलिस निरीक्षक संजय पुरंदरे व उमरेडचे तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले. इमारतीच्या फाटकाजवळ दोन डीव्हीआर आढळून आले. मात्र एलसीडी स्क्रीन चोरट्यांनी परत केल्या नाहीत.
डब्यात बंद करून पुन्हा सील
नगर परिषद उमरेडचे उपमुख्याधिकारी व पंचायत समिती उमरेडचे गटशिक्षणाधिकारी जयसिंग जाधव यांना पंचनाम्यात साक्षीदार करण्यात आले. पंचनाम्यानंतर सर्वप्रथम दोन्ही यंत्रांचे इस्टिमेट उघडल्या गेले. त्यावरील सर्व कोड नंबरची नोंद करण्यात आली. त्यानंतर लगेच ते यंत्र पूर्ववत बंद करून सील केले गेले. दोन्ही डीव्हीआर यंत्रणा एका डब्यात बंद करून पुन्हा सील करण्यात आले.
केंद्राचे पथक आज करणार पाहणी
कॉंग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एक पथक तपासणी करण्यासाठी येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच पथक नागपुरात दाखल झाले असून रविवारी उमरेड घटनास्थळाची पाहणी करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com