कर्मचाऱ्यांनी घेतली मतमोजणीची धास्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या धास्तीने अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचे अर्ज टाकून या कामासून सुटका मिळवली आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडायची कशी, याचे टेंशन निवडणूक विभागाला आले आहे.

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या धास्तीने अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचे अर्ज टाकून या कामासून सुटका मिळवली आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडायची कशी, याचे टेंशन निवडणूक विभागाला आले आहे.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 11 एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडली. खरी परीक्षा मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. 23 मे रोजी सकाळी आठ वाजतापासून कळमना बाजारात मत मोजणीला सुरुवात होणार आहे. ईव्हीएममुळे मोजणीची प्रक्रिया सोपी आणि वेळ कमी झाला असला तरी बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रांवरील व्हीव्हीपॅटसुद्धा तपासावे लागणार आहे. निकाल जाहीर व्हायला दुसरा दिवस उजाडणार आहे. जिल्हाधिकारी यांनीच तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 22 ते 24 असे तीन दिवस मतमोजणीच्या कामात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टेंशन राहणार आहे.
मतमोजणीसाठी 888 कर्मचाऱ्यांनी आवश्‍यक भासणार आहे. 288 पर्यवेक्षक, 312 सूक्ष्म निरीक्षक आणि 288 मतमोजणी सहायकांचा त्यात समावेश आहे. नागपूरसाठी 444 तर रामटेककरिता 444 मनुष्यबळ लागणार आहे. निवडणूक विभागाकडून कर्मचाऱ्यांची नावेही निश्‍चित केली आहेत. निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचीच निवड त्यात प्रामुख्याने करण्यात आली आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांना मोजणीस सोडण्यास काही विभागप्रमुखांनी नकार दिला आहे. काहींनी आधीच सुटीचा अर्ज टाकला आहे. आधीच अनुभवी दक्ष कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यातच अनेकांनी सुटीचा अर्ज टाकल्याने विभागाला चांगलेच टेंशन आले आहे.

Web Title: loksbha election news