आधी तीनशे रुपये मोजा, नंतर वजनकाटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

आरटीओची चेकपोस्टवर सर्रास लुबाडणूक
नागपूर - ट्रक चेकपोस्ट नाक्‍यावर जाण्याआधीच आरटीओचे अधिकारी चालकांकडून तीनशे रुपये उकळून सर्रासपणे लुबाडणूक करीत आहेत. तसा अलिखित नियमच आरटीओने करून ठेवला आहे. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय एकही ट्रक समोर जाऊ शकत नाही इतकी दहशत निर्माण करण्यात आली आहे.

आरटीओची चेकपोस्टवर सर्रास लुबाडणूक
नागपूर - ट्रक चेकपोस्ट नाक्‍यावर जाण्याआधीच आरटीओचे अधिकारी चालकांकडून तीनशे रुपये उकळून सर्रासपणे लुबाडणूक करीत आहेत. तसा अलिखित नियमच आरटीओने करून ठेवला आहे. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय एकही ट्रक समोर जाऊ शकत नाही इतकी दहशत निर्माण करण्यात आली आहे.

नागपूर-सावनेर महामार्ग क्रमांक 69 वर खुर्सापार येथे चेकपोस्ट आहे. दुसरे चेकपोस्ट जबलपूर रोडवरील कांद्री येथे आहे. चेकपोस्टरवर वजन काट्याचे कंत्राट सद्‌भाव कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले आहे. ट्रकचे वजन करण्यासाठी 120 रुपयांची आकारणी केली जाते. त्याची रीतसर पावती ट्रक चालकांना दिली जाते. ट्रक ओव्हरलोड असल्यास आरटीओच्या कार्यकक्षेत येतो. त्यांना कारवाई व दंड आकारण्याचा अधिकार आहे. मात्र, चेकपोस्टवर नेमलेले अधिकारी ट्रकला चेकपोस्ट येण्यापूर्वीच रोखतात. याकरिता काही कुख्यात लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रक चालकांकडून तीनशे रुपये जबरदस्तीने वसूल केले जातात. पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण केली जाते. येथून सुटका झाल्यानंतर ट्रकचालकास काट्यासाठी 120 रुपये मोजावे लागतात. यानंतर ट्रक ओव्हर लोड असो वा नसो त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आरटीओच्या वसुलीच्या फंड्यामुळे चेकपोस्ट नाके व वजन काटे फक्त नावालाच राहिले आहेत. याउलट आरटीओला मात्र अच्छे दिन आले आहेत.

दोन्ही महामार्गांवर दररोज सरासरी दीड हजार ट्रक धावतात. प्रत्येकी तीनशे रुपये याप्रमाणे रोज सुमारे साडेचार लाखांची कमाई केली जात आहे. मात्र, सर्वच यात गुंतले असल्याने कोणीच या व्यवहाराविषयी बोलत नाही. प्रकाश वंजारी यांनी मुख्यमंत्री तसेच परिवहनमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यानंतरही कारवाई होणार नसेल तर न्यायालयात दाद मागितल्या जाईल, असे वंजारी यांनी सांगितले.

गैरप्रकार चित्रबद्ध
लुबाडणुकीने ट्रकचालक प्रचंड वैतागले आहेत. मात्र, अधिकारीच पैसे मागत असल्याने सांगताही येत नाही आणि तक्रारही करता येत नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. यासर्व देवाणघेवाणीमध्ये ओव्हरलोड वाहतुकीचा मुख्य मुद्याला फारसे महत्त्व राहिले नाही. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वंजारी यांनी हा सर्वप्रकार चित्रबद्ध केला. पुरावे गोळा करून आरटीओचे अधिकाऱ्यांना दिले. मात्र, कारवाई झालेली नाही.

Web Title: loot by rto check post