अकोला - पेट्रोल पंपावर ग्राहकांची लुट

विवेक मेतकर
गुरुवार, 17 मे 2018

अकोला : शहरात ठिकठिकाणी ग्राहकांची सर्रास लुट सुरू असून पेट्रोल पंपावरील कर्मचारी अरेरावी करत ग्राहकांचे तोंड बंद करू पाहत आहेत. असे असताना ग्राहकांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाअभावी या लुटीला सुट मिळत आहे.

अकोला : शहरात ठिकठिकाणी ग्राहकांची सर्रास लुट सुरू असून पेट्रोल पंपावरील कर्मचारी अरेरावी करत ग्राहकांचे तोंड बंद करू पाहत आहेत. असे असताना ग्राहकांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाअभावी या लुटीला सुट मिळत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पेट्रोल पंपावर गुरुवारी (ता.१७) याची प्रचिती आली. एका ग्राहकाने अडीचशे रुपयांचे पेट्रोल भरले. पेट्रोल भरताना ‘शुन्य’ दाखविण्यात आले नसल्याचे ग्राहक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची बाचाबाची झाली. पेट्रोल पुन्हा मोजले असता त्यात तब्बल पाव लिटरची तुट निघाल्याने ग्राहक संतापला. मात्र, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या उध्दट वागणुकीने हताश होऊन ग्राहक निघून गेला, असे प्रकार शहरात नित्याचेच झाले आहे. 

पेट्रोल पंपावर दुपारच्या वेळी ग्राहकांच्या रांगा लागतात. अशातच घाई-गडबडीत कधी शुन्य दाखविला जात नाही, तर कधी पेट्रोलचे पैसे मागून ग्राहकांचे लक्ष विचलीत करून ‘काटा’ मारण्यात येत असल्याचे पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांनी सांगितले. 

प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल पंपावर घाई असते. कधी पेट्रोल भरून इथून आपल्या पुढील कामासाठी निघतो, असे होते. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन पेट्रोल पंपावरील कर्मचारी ग्राहकाच्या घाईचा फायदा घेऊन फसवणुक करीत असल्याचे चित्र आहे.  

ग्राहक जागृत कधी होणार?
पेट्रोल पंपावर अनेक वेळा असे प्रकार होऊन वाद होतात. मात्र, जसे दोन-चार कर्मचारी एकत्र येवून ग्राहकाशी वाद घालतात. तेव्हा त्या ग्राहकाच्या मागे रांगेत उभे असलेले ग्राहक हा प्रकार निमुटपणे पाहतात. ग्राहक आपल्या हक्काविषयी जागृत असला तर फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसू शकतो. 

तक्रार कोठे करावी ?
ग्राहकांना त्यांच्या अडचणीसंदर्भात तक्रार कोठे करावी हेच माहित नसल्याने पेट्रोल पंपावर नेहमी वाद होतात. प्रशासनाकडून यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. 

पेट्रोल भरत असताना ‘झिरो’ पाहणे ही ग्राहकांची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांना ‘झिरो’ दाखविण्याचे आम्ही सांगतो. बरेचदा गाडीमध्ये पुर्ण पेट्रोल संपते. तेव्हा पाईपलाईनमध्ये पेट्रोल जात असल्याने मोजताना कमी भरू शकते. मात्र, अशावेळी ग्राहकाला काही शंका असल्यास पाच लिटरचे परिमाणात (माप) पेट्रोल भरून पाहावे. 
- राहूल राठी, अध्यक्ष, पेट्रोल पंप असोसिएशन, अकोला. 

ग्राहकांनी अशा प्रकरणात ग्राहक संरक्षण संघाकडे तक्रार करावी. वारंवार होणारी फसवणुक टाळण्यासाठी तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्राहक संरक्षण संघ, कृष्ण मंदीर, खेडकर नगर, अकोल या पत्यावर संपर्क केल्यास प्रकरणाचा पाठपुरावा करता येईल.
- भिमराव टिकार, अध्यक्ष, ग्राहक संरक्षण संघ, अकोला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Looting customers on petrol pumps in akola