
सुरुवातीला आंदोलन तीव्र असल्याने तब्बल आठ दिवस दिल्लीत तीस हजार ट्रक जागीच उभे होते. त्यामुळे दिल्लीच्या व्यावसायिकांचे देखील 15 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती सुरळीत नाही
अमरावती ः नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका विदर्भातील मालवाहू वाहतूकदार, व्यापारी व शेतकऱ्यांना बसला आहे. आंदोलनामुळे दिल्लीकडून विदर्भाकडे येणारी आणि विदर्भाकडून दिल्लीकडे जाणारी मालवाहतूक चांगलीच प्रभावीत झाली आहे. नेहमीचा मार्ग सोडून सध्या राजस्थानमार्गे वाहतूक करावी लागत असल्याने त्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे व्यापाऱ्यांना आतापर्यंत दोन हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
सुरुवातीला आंदोलन तीव्र असल्याने तब्बल आठ दिवस दिल्लीत तीस हजार ट्रक जागीच उभे होते. त्यामुळे दिल्लीच्या व्यावसायिकांचे देखील 15 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती सुरळीत नाही. परिणामी मालवाहतूक राजस्थानमार्गे करण्याची वेळ आली आहे. यामुळे माल पोहोचण्यास विलंब होत असून भाडेदेखील वाढले आहे.
नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार
दिल्लीहून मालवाहू ट्रक विदर्भात आला तर जातेवेळी तो संत्रा अथवा करारानुसार इतर माल घेऊन परत जातो. आधी अमरावती, नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यात दररोज असे दोनशे ट्रक दिल्लीहून येत होते. आता त्यांची संख्या रोडावली आहे.
दिल्ली आणि विदर्भातील जिल्ह्यांमधून मालासाठी पूर्व नोंदणी कमी झाली आहे. सध्या गोदामात शिल्लक माल असल्याने वस्तूंचे दर नियंत्रित आहेत. मात्र आंदोलन अधिक काळ चालले तर जानेवारी वा फेब्रुवारीत हे दर वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. दिल्लीकडून विदर्भाच्या बाजारपेठांमध्ये सुका मेवा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बासमती तांदूळ, वाहनांचे सुटे भाग, फळ, कपडे, कंपन्यांना लागणारा कच्चा माल येतो. तर विदर्भाच्या बाजारपेठेतून मिरची, हळद, सागवान, संत्री, सोयाबीन, सुपारी, डाळ, तांदूळ, चणा, लोखंड, सिमेंट पाठविले जाते.
मालवाहू ट्रकच्या टनाची क्षमता यावरही प्रवासाचे दिवस अथवा भाडे अवलंबून असते. त्यात या शेतकरी आंदोलनाची भर पडल्यामुळे विदर्भातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग
शेतकरी आंदोलनामुळे विदर्भात येणारा माल विलंबाने पोहोचत आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला स्थानिक मालवाहतूकदारांनी दिल्लीकडे जाण्यास नकार दिला होता. त्याचा फटका बसला. आता इतर मार्गे मालवाहतूक सुरू आहे. मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांना जादा रक्कम मोजावी लागत आहे. जी परवडणारी नाही. या आंदोलनामुळे विदर्भाच्या व्यापाऱ्यांचे सुमारे दोन हजार कोटींचे नुकसान होत आहे.
-बी. सी. भरतिया,
अध्यक्ष, कॉन्फ्रिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स.
संपादन - अथर्व महांकाळ