अवकाळी पावसामुळे कडधान्य पिकांची हानी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

गोंदिया जिल्ह्यात 13 डिसेंबरपासून ढगाळ वातावरण निर्मिती असताना रविवारी सायंकाळी व सोमवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाचा कडधान्ययुक्त पिकांना फटका बसला आहे. कीडरोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादन घटणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

गोंदिया : अवकाळी पावसामुळे कडधान्ययुक्त पिके धोक्‍यात आली असून; शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुले पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

राजस्थानात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 13 व 14 डिसेंबरला ढगाळ वातावरणासह धुक्‍याचा प्रभाव राहील, असे संकेत हवामान खात्याने दिले होते. त्यानुसार, हे दोनही दिवस जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्मितीचे होते. रविवारी व सोमवारी हवामान खात्याकडून असे कोणतेही संकेत नसताना या दोन्ही दिवशी ढग दाटून आले होते. 

Image may contain: plant, nature and outdoor

रविवारी सायंकाळी पाचनंतर जिल्हाभर पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. रात्रीलाही बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पहाटे तीननंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. सकाळी 11.30 पर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होता. 

Image may contain: plant, flower, nature and outdoor

तूर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव 

उल्लेखनीय म्हणजे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात लाख, लाखोरी, उडीद, मूग, वाटाणा, हरभरा, जवस, करडई, तूर, भुईमूग यासह अन्य कडधान्ययुक्त पिकांची लागवड केली आहे. यातही तूर पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तूर पीक सध्या फुलोऱ्यावर आहे. अशातच ढगाळ वातावरण निर्मिती होऊन पाऊस झाल्याने फुलोरा गळून पडला आहे. काही तूरपिकांना कीडही लागली आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनात घट होणार आहे. 

Image may contain: outdoor, nature and water

भारी धानाचे कडपे भिजले 

अनेक शेतकऱ्यांनी भारी धानाची कापणी केली आहे. हे धान मळणीसाठी बांध्यात आहेत. परंतु, पावसाने हजेरी लावल्याने कडपाही भिजले आहेत. त्यामुळे आधीच खरिपातील अवकाळी पावसाने खचलेला शेतकरी या पावसाच्या माऱ्याने पुन्हा संकटात सापडला आहे. शासन, प्रशासनाने सर्वेक्षण करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा की : लग्नाला जायला निघाले अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकले... चोर ताब्यात

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मि.मी.मध्ये) 

गोंदिया : 14.40 
गोरेगाव : 32.40 
तिरोडा : 25.20 
अर्जुनी मोरगाव : 10.00 
देवरी : 5.40 
आमगाव : 19.90 
सालेकसा : 9.60 
सडक अर्जुनी : 13.20 

 हे वाचा : आनंदवार्ता! महिलांसाठी "स्मार्ट' सोय

 
मानवी आरोग्यावर वातावरण बदलाचा परिणाम 

गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना आता अवकाळी पावसानेही हजेरी लावली. अचानक झालेल्या या वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावरही परिणाम पडला आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेदेखील रुग्णांच्या गर्दीने फुल्ल दिसून येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of cereal crops due to premature rainfall at gondia