
अवकाळीमुळे १० कोटींचे नुकसान! पिकांच्या हानीचा अहवाल आयुक्तांना सादर; आता भरपाई...
अकोला : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अखेरच्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे ५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांनी हानी झाली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १० कोटी २६ लाखाची आवश्यकता आहे.
याबाबतचा संयुक्त (महसूल, कृषी व ग्राम विकास विभाग) अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप हंगामापूर्वी ही नुकसान भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी मदत होईल.
जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसामुळे पिकांची हानी झाली होती. अनेक ठिकाणची शेती जमीन खरडून गेली. त्यानंतर परतीच्या पावासानेही पिकांचे नुकसान झाले. परिणामी खरीप हंगामातील शेतमालाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले. त्यामुळे खरीपमधील नुकसान रब्बी हंगामात भरून काढू, असा निर्धार करत शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र रब्बी हंगामातही अतिवृष्टी व गारपीटमुळे पिकांची नासाडी झाली.
दरम्यान २६ व २७ एप्रिल राेजी भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. नुकसानग्रस्त क्षेत्राचे अंतिम संयुक्त (कृषी, महसूल व ग्रामविकास) पंचनामे पूर्ण झाले आहेत. या अहवालावर जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.
येथे बसला होता फटका
तालुका नुकसान (हेक्टर) बाधित शेतकरी
बार्शीटाकळी १०८४.६ २३३५
मूर्तिजापूर ४५.८५ ११९
अकाेट ३५४.७७ ५९५
बाळापूर ३६१.३३ १३९५
पातूर ४०३९.०५ ६७४२
एकूण ५८८५.६० १११८६
असे झाले क्षेत्रनिहाय नुकसान
- जिल्ह्यात ५ हजार ४१६.९३ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे नुकसान झाले. याचा फटका २४४ गावातील १० हजार ३ शेतकऱ्यांना बसला. नुकसान भरपाईसाठी ९२ लाख ८७ हजाराची आवश्यकता आहे.
- जिल्ह्यात ४६८.६७ हेक्टर क्षेत्रावरील फळबांगाचे नुकसान झाले. ही हानी १०० गावातील १ हजार १८३ शेतकऱ्यांची झाली असून, नुकसान भरपाईसाठी १० काेटी ५४ लाखाची आवश्यकता आहे.
यंदा अवकाळीने झोडपले
यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. तेल्हारा तालुक्यात ६ ते ७ मार्च राेजी २८६ शेतकऱ्यांच्या २०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली हाेती. बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर तालुक्यात १५ ते १९ मार्च दरम्यान ६३५ शेतकऱ्यांचे २ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते. बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात ३१ मार्च राेजी ६३५ शेतकऱ्यांचे ४३० हेक्टर क्षेत्रावरील पीकं जमीनदाेस्त झाली हाेती.