उपराजधानीत नोंदला मोसमातील नीचांक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नागपूर 7.2, गोंदिया 6.5 

नागपूर - विदर्भात थंडीच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, नागपुरात शुक्रवारी या मोसमातील नव्या नीचांकाची नोंद करण्यात आली. विदर्भातील सर्वांत कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली. थंडीचा कडाका आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

उत्तर भारतातील पहाडी भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे उत्तरेकडील गारठायुक्‍त वारे विदर्भाच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे विदर्भातील सर्वच शहरांमध्ये सध्या थंडीची तीव्र लाट पसरली आहे. उपराजधानीत पारा सरासरीपेक्षा सहा अंशांनी घसरून 7.2 अंशांवर आला, जो यंदाच्या हिवाळ्यातील रेकॉर्ड ठरला. यापूर्वी गेल्या 27 डिसेंबरला पारा 7.8 अंशांपर्यंत घसरला होता. गोंदियावासीही बोचऱ्या थंडीने त्रस्त आहेत. येथे शुक्रवारचे किमान तापमान संपूर्ण विदर्भात सर्वांत कमी म्हणजेच 6.5 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. याशिवाय अकोला (8.0 अंश सेल्सिअस), अमरावती (8.4 अंश सेल्सिअस), वाशीम (8.8 अंश सेल्सिअस) आणि वर्धा (9.0 अंश सेल्सिअस) येथेही पारा सरासरीपेक्षा चार ते सहा अंशांनी खाली आला. 

गुरुवारच्या तुलनेत शहरात बोचरे वारे कमी प्रमाणात जाणवले. मात्र, गारठा कायम होता. थंडीचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे सायंकाळ झाली की, जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसतात. 

Web Title: lowest temperature season nagpur