मूल तालुक्यातील पशुधन संकटात! शेतकरी दुहेरी अडचणीत

cow
cow

मूल (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील पशुधनावर संसर्गजन्य लंपी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्हा परिषदेने तात्काळ औषध उपलब्ध करून दयावी,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय मारकवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. पुणे आणि गडचिरोली जिल्हयातील ही लागण आता चंद्रपूर जिल्ह्याभर पसरत असल्याचे ते म्हणाले.

लंपी हा संसर्गजन्य रोग असून यामुळे जनावरांना जखम, ताप, शरीरावर गाठी,गळ्यावर सुज अशी लक्षणे दिसून येत आहेत. खोलवर जखम पसरून त्यात अळ्या पडत असल्याने जनावरे दगावल्याचे मारकवार म्हणाले. या रोगाची लागण कुत्र्यांना सुदधा झाली आहे. लंपी रोगाकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने याची जिल्हाभर लागण होत आहे. याला तात्काळ आवर घालणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद मात्र पशुधनावर औषधोपचार करण्यास हयगय करीत असल्याचा आरोप मारकवार यांनी केला. एकीकडे पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहे. त्यात पुन्हा लंपी रोगाची भर पडली आहे. दरवर्षी शेतसारा वसूल करणारी जिल्हा परिषद लंपी रोगाच्या निमूर्लनासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मारकवार यांनी केला.

बाजारात मिळणारी औषधी शेतक-यांना परवडणारी नाही, यावरील एक डोज अडीचशे रूपयाला आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शेतक-यांसाठी तात्काळ औषधी उपलब्ध करून दयावी,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय मारकवार यांनी यावेळी दिला.

पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, संचालक राकेश रत्नावार, शांताराम कामडी, कांग्रेसचे किसान सेल अध्यक्ष रूमदेव गोहणे, प्रदीप कांबळी, गणेश खोब्रागडे,अनिल निकेसर उपस्थित होते.

पशुवैद्यकीय चिकित्सालय पांढरा हत्ती
मूल येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय अधिका-यांअभावी पांढरा हत्ती ठरला आहे. सहा.आयुक्त काम करण्यास इच्छूक नसल्याने येथील डोलारा परिचर सांभाळतो. उपचाराअभावी शेतक-यांना आपली जनावरे परत न्यावी लागत आहे. मूल पंचायत समिती अंतर्गत दहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी राजोली मूल चिमढा राजगड गडीसूर्ला येथील काही पदे रिक्त आहे. उसराळा भांदूर्णी,पडझरी,सुशी,दाबगाव,नलेश्वर या गावांसाठी असलेला पशुवैद्यकीय दवाखाना पथक सुदधा सक्षम नसल्याचे मारकवार यांनी सांगितले.पशुवैद्यकीय अधिका-यांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी यावेळी मारकवार यांनी केली.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com