ओवाळणीच्या पैशातून बहिणीला शिलाई मशीन भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर : हातात येईल ते काम करून रात्रीची चूल पेटवणारा मोठा वर्ग आजही आपल्या देशात आहे. अशाच एका गरीब बहिणीला नागलवाडी येथील विद्यार्थ्यांनी शिलाई मशीन भेट देऊन रोजगाराचे साधन मिळवून दिले. युवा चेतना मंचने त्यांच्या या विधायक कार्यात सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

नागपूर : हातात येईल ते काम करून रात्रीची चूल पेटवणारा मोठा वर्ग आजही आपल्या देशात आहे. अशाच एका गरीब बहिणीला नागलवाडी येथील विद्यार्थ्यांनी शिलाई मशीन भेट देऊन रोजगाराचे साधन मिळवून दिले. युवा चेतना मंचने त्यांच्या या विधायक कार्यात सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
झाले असे की, महिनाभरापूर्वी साजऱ्या झालेल्या रक्षाबंधनासाठी नागलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गडचिरोली, भामरागड येथील पोलिस जवानांसाठी स्वत: तयार केलेल्या राख्या पाठवल्या. तसेच स्वहस्ताक्षरात स्वत: तयार केलेले शुभेच्छापत्रही पाठविले. पोलिस जवानांसाठी विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या राख्या आणि त्यांच्या भावना वाचून पोलिस अक्षरश: गहिवरलेच. रक्षाबंधन म्हटले की, ओवाळणी आलीच. पोलिसांनीही हात आखडता न घेता ओवाळणीसाठी तत्परता दर्शवली. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी अगदी लगेच "आपल्या आई, ताई घरात हातभार म्हणून रोज कचरा वेचायला जातात. सरांनी दिलेल्या शिवणकाम प्रशिक्षणामुळे त्या कपडे शिवू शकतात. परंतु, निव्वळ मशीन नसल्याने काम मिळत नाही. तेव्हा सर हे पैसे नको. आपण अजून जमा करू अन्‌ ताईले शिलाई मशीन घेऊन देऊ' असे सांगितले. विद्यार्थ्यांचे हे शब्द त्या क्षणाला खरंच क्रांतिकारी वाटत होते.
त्यांच्या या विचारांचे मोल लक्षात घेत ओवाळणीची रक्‍कम व युवा चेतना मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने नवीन शिलाई मशीन घेण्यात आली. स्वयंसिद्ध अभियानासाठी युवा चेतना मंचने घेतलेल्या या उपक्रमात विद्यार्थीदेखील सक्रिय सहभाग घेत आहे, याहून दुसरे समाधान नसल्याची भावना मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. नवीन शिलाई मशीन देण्याचा कार्यक्रम नागलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडला. यावेळी युवा चेतना मंचचे मार्गदर्शक श्रीकांत देहाडराय, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना राऊत, शिक्षिका सौ. साखरकर, युवा चेतना मंचचे दत्ता शिर्के, अभिषेक सावरकर, नेहा लोंढे, रिमा लोंढे, मनीषा लोंढे व विद्यार्थी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: machine gift to sister