पालकमंत्री येरावार यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे.

यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे.

शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न मिळाल्याने आरुषी किरण देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी राजकिरण इंगळे यांनी आयुषी किरण देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुन्हे दाखल करून 30 दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मंगळवारी (ता.14) पोलिसांना दिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (ता. 16) रात्री उशिरा पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, या आदेशाविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयात त्यावर आज सुनावणी झाली. प्रतिवादींच्या वतीने ऍड. जगदीश वाधवानी व ऍड. अशोक गुप्ता यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. प्रतिवादींनी उत्तर सादर करेस्तोवर वा पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती राहणार आहे.

काय आहे आरोप
यवतमाळच्या अवधूतवाडी येथील एकूण नऊ हजार 241 चौरस फूट भूखंडाचे हे प्रकरण आहे. त्यापैकी दोन हजार 309 चौरस फूट जागा किरण देशमुख यांनी खरेदी केली होती. मात्र, कोल्हे कुटुंबीयांनी सात हजार 887 चौरस फुटांऐवजी थेट नऊ हजार 241 चौरस फूट जागेची विक्री मदन येरावार व अमित चोखाणी यांना 2013 व 2016 मध्ये केली. किरण देशमुख यांची मालकी लपविण्यासाठी शासकीय कागदपत्रांत खोडतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.

Web Title: Madan Yerawar Inquiry Stop Court