शिक्षण घेऊन माधुरी करणार स्वयंरोजगार

देसाईगंज : मानसिक विकलांग माधुरी भोयरच्या सत्कारप्रसंगी उपस्थित शिक्षकवृंद.
देसाईगंज : मानसिक विकलांग माधुरी भोयरच्या सत्कारप्रसंगी उपस्थित शिक्षकवृंद.

देसाईगंज (जि. गडचिरोली) : भविष्यात आपण काय होणार, कोणता अभ्यासक्रम निवडणार हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. परंतु, देसाईगंज येथील पार्वता निवासी मतिमंद विद्यालयातील एका मतिमंद मुलीने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर स्वयंरोजगार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिला नागपूर येथील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पार्वती निवासी मतिमंद विद्यालय ही एक सेवाभावी संस्था असून मागील 20 वर्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अविरत कार्य करीत आहे. या शाळेचे मुख्य उद्दिष्ट असे की, गावातील असो वा परिसरातील दिव्यांग मुलांची शोधमोहीम राबवत अशा मुलांना प्रशिक्षणासाठी व त्यांच्या कौशल्यांच्या विकासासाठी शाळेत प्रवेश करून देण्यात येतो. गडचिरोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात उच्च दर्जाचे शिक्षण देणे व या मानसिक विकलांग मुलांचे संगोपन करणे व शासनातर्फे मिळणाऱ्या निरनिराळ्या योजनांचे लाभ मिळवून यासाठीसुद्धा शाळा कार्य करत असते. वयाच्या 6 व्या वर्षी मुलाला शाळेत प्रवेश देण्यात येतो व सर्वप्रथम त्याच्या पालकांची अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. वयाच्या 18 वर्षांपर्यंत त्या विद्यार्थ्यांना अर्ध रोजगाराच्या भूमिकेत तयार करण्यात येतो. याच शाळेत शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी माधुरी प्रेमलाल भोयर हिला शाळेतून नुकताच निरोप देण्यात आला व पुढील शिक्षणाकरिता नागपूर येथे शिफारस करून तिला प्रवेश मिळवून देण्यात आला. यावेळी माधुरी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली की, मागील नऊ वर्षापासून मी मतिमंद विद्यालयात शिक्षण घेत होते. या शिक्षणातून मला बरेच काही शिकता आले. शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शालेय वातावरण हे मतिमंद बालकांसाठी अतिशय चांगले आहे. या शिक्षणाचा आपणाला भविष्यात चांगला फायदा होईल. व्यावसायिक शिक्षण घेऊन छोटासा रोजगार करण्याचा माझा मानस असल्याचे तिने सांगितले.

मदतीची तयारी
एकदा का शाळेतून विद्यार्थी बाहेर गेला की, त्याचे तेथील शिक्षकांशी संबंध राहात नाही. प्रसंगी मदतीसाठी धावणारे बोटावर मोजण्याइतकेच लोक शैक्षणिक क्षेत्रात असतात. मात्र, देसाईगंज येथील पार्वता निवासी विद्यालयाने विकलांग माधुरीच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यासह सहकार्य करण्याची जबाबदारी घेतली. निरोप समारंभात शाळेतर्फे माधुरीला बुक, पेन्सिल, कंपास, बॅग, कपडे व तिला उपयुक्त अशा दैनंदिन वापरातील वस्तू भेट देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com