वाघांच्या शिकारीचे एमपी कनेक्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

अमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य प्रदेशशी जुळले असल्याचेही समोर आले. 

अमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य प्रदेशशी जुळले असल्याचेही समोर आले. 

गिरगुटी येथील सानू ताणू दारशिंबे व संजय ऊर्फ बन्सीलाल हिरालाल जामुनकर या दोघांच्या अटकेनंतर वनाधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही बाब उघड झाली. दोघांनी ही शिकार केल्यानंतर वन्यप्राण्यांची कातडी, नखे, दात हे अवयव मध्य प्रदेशातील व्यक्तीच्या ताब्यात दिले. वाघ, बिबटच्या कातडी व दातांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपयांची किंमत आहे. परंतु ज्या व्यक्तीने वन्यप्राण्यांचे अवयव घेतले; ती व्यक्ती जादूटोणासारखे प्रकार करते, असा संशय सूत्रांनी व्यक्त केला. मात्र, त्या व्यक्तीचे नाव उघड करण्यास वनाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्याच्या तपासासाठी पूर्व मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाचे पथक मध्य प्रदेशात जाणार आहे.

यापूर्वीही वनगुन्हे अन्वेषण विभागाने बिबट व अस्वल शिकार प्रकरणात मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीला अटक केली होती. परंतु वर्षभरापूर्वी झालेल्या व्याघ्रशिकारीत ही टोळी नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. चार वाघ व एक बिबट्याच्या शिकारीसाठी पकडण्यात आलेल्या दोघांना नेमका किती आर्थिक लाभ झाला, हेसुद्धा पुढे येऊ शकले नाही. 

Web Title: Madhya Pradesh Connection of Tiger Hunting