नातवाच्या सुटकेसाठी न्यायालयातच केला जादूटोणा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

विनयभंग आणि बालकांचे लैंगिक शोषण कायद्यातील असलेल्या आरोपी नातवाच्या सुटकेसाठी आजीने चक्क प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कक्षासमोरच सुगंधीत मोहरी टाकून मंत्र पुटपुटले.

अकोला : विनयभंग आणि बालकांचे लैंगिक शोषण कायद्यातील असलेल्या आरोपी नातवाच्या सुटकेसाठी आजीने चक्क प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कक्षासमोरच सुगंधीत मोहरी टाकून मंत्र पुटपुटले. हा प्रकार शुक्रवारी (ता. ११) निदर्शनास येताच न्यायालयीन कर्मचाऱ्यांने तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, आधी हे प्रकरण चौकशीसाठी ठेवण्यात आले होते, आता याप्रकरणात महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंध व अघोरी प्रथा उच्चारण अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, १३ वर्षीय पीडितेशी अश्लील चाळे करण्याच्या कारणावरून मूर्तिजापूर पोलिसांनी समीर शाह सलीम शाह यास अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये पोलिसांनी आरोपीस कारागृहात पाठविले होते. कारागृहात बंद असलेल्या आरोपीस जमानत देण्यासाठी त्याचे नातेवाईक न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत. यातच शुक्रवारी दुपारी दोन बुरखाधारी महिला जिल्हा न्यायालयात आल्या. त्यातील जरीनाबी नरसुल्ला शाह (वय ४८, रा. अकोटफैल) या महिलेच्या नातवाचा खटला सुरू आहे. 

जिल्हा न्यायाधीश प्रथम यांच्या न्यायालयाच्या कक्षासमोरच यातील जरीनाबी या महिलेने सुगंधीत पिवळसर पांढरी मोहरी टाकून काहीतरी पुटपूटून व फुसफूस करताना आढळून आली, तिचे हे आचरण अनिष्ठ व अघोरी असल्याने आणि यामुळे सर्वसामान्यांमध्ये भिती निर्माण करणारे दिसून आल्याने याबाबत त्या महिलेला विचारणा केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही.

याप्रकरणी न्यायालय प्रभारी अधीक्षक दिनेश जनार्दन अलकरी (वय ५५) यांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंध व अघोरी प्रथा उच्चारण अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामदासपेठ पोलिस करीत आहेत.

गुन्हा दाखल करण्यासाठी लागले चार दिवस
मोहरी टाकून आणि त्यावर पाणी शिंपडल्याचा प्रकार न्यायालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी पाहिला. हा जादुटोण्याचा प्रकार असावा. म्हणून त्या महिलांची न्यायालयाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली.

पोलिसांनी त्या दोन महिलांची आधी चौकशी केली. परंतु तक्रारीत अंधश्रद्धा, जादुटोण्याचा उल्लेख नसल्यामुळे कोणती कारवाई करावी. असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्यामुळे पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली होती. अखेर याप्रकरणातील तक्रारीत दुरुस्ती करून चौथ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: magical in court for the release of grandchildren!