भाजप हाउसफुल्ल!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) - ‘‘भाजप कुणाच्याही मागे फिरत नाही. पुढारी व नेते फिरतात. प्रवेश मागतात. जे योग्य असतील त्यांना प्रवेश देतो, इतरांसाठी हाउसफुल्लचा बोर्ड लावला आहे. पुन्हा सत्ता येणार आहे. चिंता नाही,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा करून विरोधकांना स्थान मिळणार नसल्याचा इशारा दिला. 

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) - ‘‘भाजप कुणाच्याही मागे फिरत नाही. पुढारी व नेते फिरतात. प्रवेश मागतात. जे योग्य असतील त्यांना प्रवेश देतो, इतरांसाठी हाउसफुल्लचा बोर्ड लावला आहे. पुन्हा सत्ता येणार आहे. चिंता नाही,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा करून विरोधकांना स्थान मिळणार नसल्याचा इशारा दिला. 

‘‘पाच वर्षांपूर्वी जनतेने जनादेश दिला होता. यंदाही तो मिळणार आहे. त्यासाठीच त्यांच्या दारी जाऊन अपेक्षा जाणून घेणार असून, त्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे,’’ असे ते म्हणाले. श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथून भाजपच्या महाजनादेश यात्रेला आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य या वेळी उपस्थित होते.

‘‘पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत जे काम तुम्ही केले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले. आम्ही जे दावे करतो त्या विकासकामांवर जनादेश मागत आहोत. यातील एक जरी मुद्दा खोडून दाखविला, तर पुन्हा जनादेश मागण्यासाठी बाहेर पडणार नाही. चर्चेसाठी विरोधकांनी कोणत्याही व्यासपीठावर यावे,’’ असे खुले आव्हानच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिले. सध्या भाजपमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेत्यांचे प्रवेश सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर योग्य नेत्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सिंचन, वीजजोडण्या, रस्ते बांधणी, पाणीपुरवठा योजना आम्ही पूर्ण करून दाखविल्या. तुम्ही यातील काय केले, असा सवाल त्यांनी केला.

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पंधरा वर्षे तुम्ही जनतेचे प्रश्‍न सोडविले नाहीत, कोडगेपणाने वागलात. आम्ही पाच वर्षांत विकास करून दाखविला. त्याच जोरावर पुन्हा सत्तेत येऊ. चिंता सत्तेची नाही, नेहमी येणाऱ्या दुष्काळाची आहे. पुढील मिशन दुष्काळमुक्त महाराष्ट्र आहे. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीचे आहे.’’

या वेळी भाजप २२० जागा स्वबळावर जिंकण्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. आम्ही त्यापलीकडेही जागा जिंकू शकतो, असा दावा करीत सभागृहात काही विरोधकही हवेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.

महाजनादेश यात्रेच्या सभेचे प्रास्ताविक पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. याप्रसंगी मंत्रिमंडळातील मंत्री राम शिंदे, गिरीश महाजन, संजय थुटे, संभाजी निलंगेकर, आशीष शेलार, अशोक उईके यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री विद्या ठाकूर, प्रकाश मेहता, राज्यमंत्री रणजित पाटील, मुंबई प्रदेश अध्यक्ष लोढा, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, महामंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार प्रवीण दरेकर, प्रकाश भारसाकळे, डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते.

युती कायम
लोकसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होती याचे स्मरण करून देत, विधानसभेतही ती राहणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत युतीच्या २५० हून अधिक जागा निवडून येतील. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणीसुद्धा त्यांनी केली. फडणवीस यांचे कौतुक करताना त्यांनी, सलग पाच वर्षे राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नसल्याचे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahajandesh Yatra start