महंत कारंजेकर बाबा यांच्या देहावसनाने शोक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

अमरावती : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 19) दुपारी त्यांच्या पार्थिवावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमरावती : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 19) दुपारी त्यांच्या पार्थिवावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई येथे उपचार घेत असतानाच कारंजेकरबाबा यांचे निधन झाले. शुक्रवारी (ता. 18) उशिरा रात्री त्यांचा पार्थिव देह अमरावतीत आणण्यात आला. राजापेठ येथील कंवरनगर परिसरातील महानुभाव आश्रमात त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या वेळी राज्यासह विविध भागांतील मान्यवर, महंत तसेच नागरिकांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली. दुपारी वलगावनजीकच्या रेवसा फाट्यावरील प्रमोद बनसोड यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महंत कारंजेकरबाबा यांचा जन्म 2 मे 1948 रोजी झाला. त्यांचे शिक्षण दिल्ली येथे झाले. लहानपणीच त्यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली. महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, प्रवचक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
महानुभाव पंथाला संघाशी जोडले ः सरसंघचालक
कारंजेकर बाबांनी महानुभाव पंथाला संघाशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य केले. हे संबंध दृढ होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, अशा शोकसंवेदना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या. प्रवासी कार्यकर्ता शिबिरासाठी अमरावतीला मुक्कामी असलेल्या श्री. भागवत यांनी कंवरनगर परिसरातील महानुभाव आश्रमात कारंजेकर बाबा यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी महानुभाव आश्रमाचे मोहनदादा अमृते, विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, अमरावती विभाग कार्यवाह शिवा पिंपळकर, महानगर कार्यवाह संजय गुळवे उपस्थित होते.

Web Title: Mahant Karanjekar Baba's body mourns