वन्यप्राण्यांऐवजी केवळ उत्पन्नावर नजर

Maharajbag
Maharajbag

नागपूर - महाराजबाग प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांना आवश्‍यक नैसर्गिक वातावरणाऐवजी त्यांना कोंबून ठेवल्याचे दिसून येत आहे. प्राण्यांच्या देखभालीसाठी सेंट्रल झू ॲथॉरिटीच्या निकषाची पायमल्ली होत आहे. नागरिकांसह वन्यप्राणीप्रेमींनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाने केवळ महाराजबागेतून मिळणाऱ्या मोठ्या उत्पन्नावरच नजर केंद्रित केली आहे. 

महाराजबागेत वन्यप्राण्यांसाठी अनेक वर्षांपासून असलेली गुहा दुरवस्थेत आहे. या गुहेत बिबट, अस्वल असून त्यांना अरुंद जागेत फिरणेही कठीण झाले आहे. प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना कोंडवाड्यात ठेवल्याचे दृश्‍य महाराजबागेत दिसून येत आहे. या वन्यप्राण्यांना जंगलात असल्याचा ‘फिल’ यावा, यासाठी वेगवेगळ्या जागांवर त्यांच्यासाठी मांस किंवा इतर खाद्य देण्याचे नियमात आहे. वन्यप्राणी बघण्यासाठी येणारे नागरिक व प्राण्यांत मोठे अंतर असावे, यासाठी खंदक खोदणे अपेक्षित आहे. याशिवाय नागरिकांना ते स्पष्ट दिसावे, यासाठी गुहेपुढे काच लावण्याची गरज आहे. मात्र, ज्या वन्यप्राण्यांच्या बळावर कोट्यवधी मिळत आहेत, त्यांच्यासाठी कुठल्याही आवश्‍यक सुविधा नाहीत. अनेक वर्षांपासून गुहेची दुरुस्ती नसून सेंट्रल झू ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमांनाही बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहे. 

वाघाच्या फिरण्यासाठी मोठी जागा आहे. येथे एकच वाघ असून त्यासाठी आरक्षित परिसरातील तारेचे कुंपण वाघाच्या एका धक्‍क्‍याने तुटण्याची शक्‍यता आहे. नियमानुसार कुठल्याही प्राणिसंग्रहालयात नर व मादा असे प्राणी असणे आवश्‍यक आहे. परंतु या नियमालाही विद्यापीठाने हरताळ फासला आहे. गेल्या काही वर्षांत येथील अनेक प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. तज्ज्ञ डॉक्‍टरांची चमू नसल्याची किंमत प्राण्यांना जीव देऊन चुकवावी लागत आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून या मुक्‍या प्राण्यांना वाळीत टाकल्याचेच चित्र आहे. हे सारे एका गुप्त उद्देशाने होत असल्याची चर्चा पशुप्रेमींत रंगली आहे. 

सेंट्रल झू ॲथॉरिटीची नोटीस 
महाराजबागेतील प्राणीसंग्रहालाच्या दुरावस्थेवरून यापूर्वी २०१२ मध्ये सेंट्रल झू ॲथॉरिटी ऑफ इंडियाने कृषी विद्यापीठाला नोटीस दिली होती. प्राणीसंग्रहालयात अनेक सुधारणांची गरज व्यक्त करीत सुविधा नसल्याने अधिक प्राणीही ठेवू नये, असा इशाराही दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून या नोटीसलाही केराची टोपली दाखविली.

नैसर्गिक वातावरण देण्यात अपयश
महाराजबागेतून जंगलात सोडण्यात आलेले हरीण आदी प्राणीही अधिक काळ जगू शकलेले नाहीत. कृषी विद्यापीठ प्रशासन वन्यप्राण्यांना नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याने येथील प्राणी जंगलात जिवंत राहू शकत नसल्याचे एका तज्ज्ञाने नमूद केले. 

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला कधीही प्राधान्य नव्हते. केवळ कोट्यवधींच्या उत्पन्नावर विद्यापीठाचे लक्ष आहे. त्यामुळेच विद्यापीठ या प्राणिसंग्रहालयाला गांभीर्याने घेत नसून सेंट्रल झू ॲथॉरिटीच्या निकषाला हरताळ फासला जात आहे. 
- कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक, नागपूर जिल्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com