शपथविधी ठरला शिवसेना नेत्यांच्या नाराजीचा सोहळा

सागर कुटे
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातून एकमेव सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाली. अकोला व वाशीम जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले.

अकोला : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी (ता.30) पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारावर बुलडाणा व वाशीमचे शिवसेनेचे खासदार यांनी उघड नाराजी व्यक्त केली. तर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवसह नाराज आमदारांनी यांनी एका खोलीत बसून शपथविधी सोहळा पाहिला. या घडामोडीत अकोला व वाशीम मंत्रिपदापासून वंचित राहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज (ता.30) पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अकोल्यातील शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरीया, बुलडाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आ.डॉ.संजय रायमूलकर यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र, वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातून एकमेव सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाली. अकोला व वाशीम जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले.

Image may contain: 4 people, people smiling, beard and text 

 

हेही वाचा - मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना खासदारांचीच नाराजी

या कारणामुळे खा. भावना गवळींची नाराजी
विशेष म्हणजे संजय राठोड यांची पुन्हा कॅबीनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. संजय राठोड युतीच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. ते वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. तेंव्हापासूनच खासदार भावना गवळी व संजय राठोड यांच्यात पक्षांतर्गत शितयुद्ध शिगेला पोचले होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे खासदार भावना गवळी यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

क्लिक करा - नववर्षाचे स्वागत थ..थ..थंडीने

अन् शिवसेना नेत्यांनी शपथविधीला जाणे टाळले
बुलडाणा जिल्ह्यातून डॉ.संजय रायमूलकर व अकोल्यातून आ.गोपीकिशन बाजोरीया यांना मंत्रिपद न मिळाल्याने खासदार प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमुलकर, आ.संजय गायकवाड, आ.गोपीकिशन बाजोरीया यांनी शपथविधीला जाणे टाळले. शपथविधी सोहळा एका खोलीत बसून दूरध्वनीच्या माध्यमातून पाहिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केलेल्या मंत्रिमंडळावर शिवसेनेच्याच दोन खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याने ही नाराजी कशी दूर होते यावर लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cabinet expantion some leaders of shivsena are unhappy