तलवार सोडा, हाती घ्या ‘आयपॅड’

अरुण जैन
रविवार, 14 जानेवारी 2018

सिंदखेडराजा - आता आम्हाला खरा मित्र आणि शत्रू कोण, याची जाणीव झाली आहे. आज माहिती, तंत्रज्ञान व ज्ञानाच्या युगात हातातील तलवार काढून ‘आयपॅड’ घेण्याची वेळ आली आहे. कोणीतरी लढवतं आणि आपण लढतो, ही मानसिकता बदलविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले.

सिंदखेडराजा - आता आम्हाला खरा मित्र आणि शत्रू कोण, याची जाणीव झाली आहे. आज माहिती, तंत्रज्ञान व ज्ञानाच्या युगात हातातील तलवार काढून ‘आयपॅड’ घेण्याची वेळ आली आहे. कोणीतरी लढवतं आणि आपण लढतो, ही मानसिकता बदलविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले.

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित धर्मपीठावरून श्री. खेडेकर बोलत होते. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले व तंजावरचे बाबा महाराज भोसले यांच्यासह खासदार प्रतापराव जाधव, माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार रेखाताई खेडेकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, हरियानाचे प्रदेशाध्यक्ष मांगीराम चोपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

पुरुषोत्तम खेडेकर पुढे म्हणाले की, बहुजन समाजाने सर्वात आधी स्वत:चा विचार करावा. कुणीही राजकारणी मदत करीत नाही. चार मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन देऊनसुद्धा ४०० पेक्षा अधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळेची व्यवस्था केली नाही. कर्ज काढू नका, व्यसनांमध्ये पैसा घालवू  नका, फालतू मॅसेजेस पाठवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे व बहुजन समाजामध्ये फुट पाडण्याचे कारस्थान वेळीच हाणून पाडा. आरएसएस या देशातील सर्वच पक्षांना चालविते. त्यामुळे बहुजनांना भडकविण्याचे काम होऊ नये. बहुजन समाजामध्ये कोणताही वाद नाही. वाद आहे तो राजकीय नेत्यांमध्ये. कोरेगाव-भीमा हे प्रकरण एका दिवसात घडलेले नाही. त्याची पार्श्‍वभूमी जाणीवपूर्वक तयार करण्यात आली आहे. मुलांच्या हातात तलवारी आणि दगड देण्यापेक्षा आपण ज्ञानाच्या जगात राहतो, याची जाणीव त्यांना होऊ द्या. 

शेतकऱ्यांनी शक्‍यतो कर्ज काढू नका आणि आत्महत्या करू नका, व्यसनापासून दूर राहा. आजवर कोणत्याही दारूचा दुकानदार उधारीत व्यवसाय करीत नाही. त्याला देण्यासाठी आपल्याकडे पैसा असतो पण मुलांच्या शिक्षणासाठी  नसतो, असे करू नका. आज बहुजन समाजाने प्रतिक्रियावादी होऊन विपरीत घडण्याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे नको त्या बाबी बोलू नका आणि अफवांवर विश्‍वास ठेवू नका. वरुड येथे असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक एकबोटेच्या ताब्यातून काढून घ्या. तेथे आपण गोविंद गोपाळ महार यांची समाधी पुन्हा चांगली बांधू. समाजातील मुस्लीम, महार, मातंग, मराठा, मारवाडी, कोळी, माळी या सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या वाटेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. 

यापूर्वी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले की, शिवरायांचे तीनही वंशज एका व्यासपीठावर येण्याची ही पहिली वेळ आहे. समाजाने इतर ठिकाणी पर्यटन केल्यापेक्षा सिंदखेडराजा व रायगडावर यावे. 

सिंदखेडराजात अद्ययावत ग्रंथालयासाठी ५० लाख रुपये देण्याची तयारी त्यांनी बोलून दाखविली. यावेळी छत्रपती बाबाजी भोसले, खासदार प्रतापराव जाधव, माजी खासदार नाना पटोले, रविकांत तुपकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन ॲड. मुथाळकर यांनी केले. 

Web Title: maharashtra news Sindkhedaraja Purushottam Khedekar