Vidhan Sabha 2019 : भंडारा जिल्हा : बंडखोरांच्या आव्हानाने लढती लक्षवेधी

Bhandara-District
Bhandara-District

तुमसर, भंडारा आणि साकोली मतदारसंघांत मिळून ३९ उमेदवार रिंगणात आहेत. अजूनही काही बंडखोर उमेदवारांचे आव्हान कायम राहिले आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केल्याने लढती उत्कंठापूर्ण झाल्या आहेत. तुमसर मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आमदार चरण वाघमारे यांना अटक झाल्याने वातावरण तापले होते. यातच त्यांना भाजपची उमेदवारी न देता भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राइस मिल असोसिएशनचे अध्यक्ष राजू कारेमोरे यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने डावलल्यामुळे वाघमारे संतापले असून, त्यांनी अपक्ष म्हणून दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे प्रमुख उमेदवार एकाच समाजातील असल्याने पोवार आणि कुणबी समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. अपक्ष खेमराज पंचबुद्धे, माजी आमदारपुत्र पंकज कारेमोरे हेसुद्धा दावेदारांची डोकेदुखी वाढवू शकतात.

भंडारा मतदारसंघात काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) आघाडीने जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप यांना संधी दिली. भाजपने अरविंद भालाधरे यांना उमेदवारी दिली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंड करीत अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. वर्षभरात केलेल्या कामांचा फायदा होईल, असा विश्‍वास बाळगून ते मैदानात उतरलेत. या वेळी भाजप, काँग्रेसने बौद्ध समाजातील उमेदवारांना संधी देऊन पुन्हा एकदा आव्हान स्वीकारले आहे. साकोली मतदारसंघात पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी देऊन भाजपने मतदारांना आश्‍चर्याचा धक्का दिलाय. नाना पटोले यांना काँग्रेसने रिंगणात उतरवलेय. सेवक वाघाये आणि पटोले या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळते, हे अखेरच्या क्षणापर्यंत गुलदस्तात होते. अखेर पटोलेंना उमेदवारी मिळाली. त्यानंतर वाघाये यांनी बंडाचा झेंडा फडकावला आणि बहुजन वंचित आघाडीशी हातमिळवणी करून त्यांची उमेदवारी मिळवली. त्यांच्या उमेदवारीने साकोलीतील लढत रंजक झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com