Vidhan Sabha 2019 : नागपूर शहर : काँग्रेस गटबाजीने चिंतेत

Nagpur-City
Nagpur-City

विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील एकूणच परिस्थिती बघता शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना ताटकळत राहावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा षटकार खेचला. यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने नागपूर शहरामध्ये पक्ष अधिकच बळकट झाला. महापालिकेच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढे तब्बल १०८ नगरसेवक भाजपचे निवडून आले. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधींचा निधी शहराला दिला. आता त्यातील त्रुटी काढून फक्त टीका करण्याशिवाय विरोधकांजवळ पर्याय उरलेला नाही. मेट्रो धावली, रस्ते काँक्रीटचे झाले, सिंबायोसिस सुरू झाले, झोपडपट्टीधारकांना मालकीपट्ट्यांचे, तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचे वाटपही सुरू झाले. एकूणच भाजपत उल्हासाचे वातावरण असताना प्रमुख विरोधक काँग्रेस जन अद्यापही आपआपसातच भांडत आहेत.

काँग्रेसचे शहरातील प्रमुख नेते विलास मुत्तेमवार पराभवाच्या भीतीने यंदा लोकसभेची निवडणूकच लढले नाहीत. त्यामुळे भंडाऱ्यातून नाना पटोले यांना आयात करण्यात आले. त्यांनाही नितीन गडकरी यांनी अडीच लाखांच्या मताधिक्‍याने पराभूत केले. एकूणच सर्व परिस्थिती सध्या काँग्रेसच्या विरोधात आहे. मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे अनेक वर्षांपासून काँग्रेस कमिटीवर एकछत्री राज्य आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांचे पाठबळ त्यांना होते. आता परिस्थिती बदलली आहे. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाले असून, मोहन प्रकाश यांना हटवून मल्लिकार्जुन खरगे यांना प्रभारी करण्यात आले आहे. त्यामुळे मुत्तेमवार-ठाकरे विरोधी गट सक्रिय झाला आहे. यात माजी मंत्री आणि शहरातील दबंग नेते म्हणून ओळखले जाणारे सतीश चतुर्वेदी यांचे निलंबनही रद्द झाले आहे. तसेच नितीन राऊत यांना प्रदेशचे कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आतापासून काटाकाटीचे राजकारण सुरू आहे. 

काँग्रेसमधील सुडाचे राजकारण
सुडाच्या राजकारणामुळे काँग्रेसचे हाल झाले आहेत. मुत्तेमवार-ठाकरे गटाने महापालिकेत पुरेशा जागा न दिल्याने राऊत-चतुर्वेदी यांच्यातील वाद विकोपाला गेले. ते आजही आहेत. याचा वचपा तिकीट वाटपात निघण्याची शक्‍यता आहे. अनेक वर्षांपासून तयारीतील उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो. ठाकरे आणि समर्थकांना उमेदवारीच मिळू नये, याकरिता काँग्रेसमधील उर्वरित गटांनी फिल्डिंग लावली आहे. एकूणच याही वेळी नागपूरचा वाद दिल्लीपर्यंत पोचणार असल्याचे दिसते.

कोणाचा पत्ता कट होणार?
भाजपचे या वेळी किमान तीन उमेदवार बदलणार असल्याची चर्चा आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघावर माजी महापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटकेंनी दावा केलाय. येथे विकास कुंभारे पक्षाचेच आमदार आहेत. विकास ठाकरेंनी भाजपत प्रवेश केल्यास पश्‍चिम नागपूरमधून त्यांना उमेदवारी मिळू शकते. यापूर्वी ते येथूनच लढलेत. येथे भाजपचे सुधाकर देशमुख आमदार आहेत. दक्षिण नागपूरमध्ये माजी आमदार मोहन मते प्रबळ दावेदार मानले जातात. त्यांनी कार्यक्रमांचा धडाकाच लावलाय. येथे सुधाकर कोहळे आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधूनच लढणार असल्याचे स्पष्ट केलंय. पूर्व नागपूरमधून कृष्णा खोपडेंना डावलणे अवघड आहे. लोकसभेत सर्वाधिक मताधिक्‍य त्यांनीच पक्षाला मिळवून दिलंय. उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने आमदार असून, त्यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नाही.

शिवसेना-राष्ट्रवादीची अडचण
शिवसेना आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद नागपुरात नाही. तरीही शिवसेनाला दक्षिण नागपूर हवंय. राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक शहरात असताना आघाडीत त्यांनाही दोन जागा हव्यात. भाजप आणि काँग्रेस मित्र पक्षाला जागा सोडण्याची शक्‍यता कमीच असल्याने याचे परिणाम निवडणुकीत दिसून येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com