Vidhan Sabha 2019 : वाशीम जिल्हा : बंडखोरीमुळे तीनही मतदारसंघांत चुरस!

Washim-District
Washim-District

वाशीम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत युती आणि आघाडीतील बंडखोरांनी निवडणुकीची दिशाच बदलली असून, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या आधी एकांगी वाटणारी निवडणूक काट्याच्या लढतीकडे झुकत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यामध्ये वाशीम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. युती आणि आघाडीसमोर उमेदवारी अर्ज भरत असतानाच बंडखोरांनी आव्हान उभे केले होते. युती आणि आघाडीतील पक्षनेतृत्वाकडून बंडखोरी मोडीत काढण्याचे प्रयत्न झालेत. पण, प्रत्यक्षात बंडोबांनी आपले निशाण फडकत ठेवल्याने, मतदारसंघातील निवडणुकीचे वारे वेगळ्या दिशेने वाहत असल्याचे चित्र आहे. युतीच्या जागावाटपात कारंजा आणि वाशीम हे दोन मतदारसंघ भाजपकडे, तर रिसोड शिवसेनेकडे गेला आहे. वाशीममधून भाजपकडून आमदार लखन मलिक हे पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले शशिकांत पेंढारकर यांनी बंडखोरी करत रिंगणात उडी घेतलेली आहे. त्यांच्या प्रचार बॅनरवर शिवसेनेच्या स्थानिक खासदार आणि शिवसेना नेत्यांचे फोटो असल्याने युतीतील विसंवादाचे चित्र समोर येत आहे. मलिक यांच्या विरोधात काँग्रेसकडून डॉ. रजनी राठोड, तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेची बंडखोरी भाजपला महागात पडणारी आहे, तर दुसरीकडे वंचित आघाडीने घेतलेला काँग्रेसचा परंपरागत मतदार काँग्रेसला घाम फोडत असल्याचे चित्र आहे.

कारंजा मतदारसंघात भाजपकडून राजेंद्र पाटणी रिंगणात आहेत. आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यास गेली. राष्ट्रवादीकडून शिवसेनेतून आलेले प्रकाश डहाके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेना डहाकेंच्या प्रचारात गुंतल्याचे दिसून येते. मागील वेळी वंचित बहुजन आघाडीकडून लढलेले युसूफ पुंजानी यांनी बहुजन समाज पक्षाच्या हत्तीवर स्वारी केली असून, या मतदारसंघातील जातीय गणिताबरोबरच स्थानिक उमेदवारांचा प्रश्‍न निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार असल्याचे चित्र आहे. 

रिसोड मतदारसंघात काँग्रेसने आमदार अमित झनक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंड करत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून विश्‍वनाथ सानप यांना उमेदवारी मिळाली असून, कारंजा आणि वाशीममधील शिवसेनेचा युतीधर्म सोबत नसल्याने या मतदारसंघात भाजप शिवसेनेला कितपत मदत करणार, हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी नेहमीच तारक ठरलेला अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजाचा मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळत आहे.

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अमित झनक यांचे समर्थक दिलीप जाधव यांनी ‘वंचित’कडून मैदानात उडी घेतल्याने या मतदारसंघात काँग्रेसचा हक्काचा मतदार ‘वंचित’कडे गेल्यास झनक यांची हॅटट्रिक हुकण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते अपक्ष उमदेवार अनंतराव देशमुख यांच्या प्रचार रॅलीत दिसत असल्याने या मतदारसंघातील सामना लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com