Vidhan Sabha 2019 : यवतमाळ जिल्हा : नवे चेहरे आणणार लढतीत रंगत

राजकुमार भीतकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

संभाव्य नवीन चेहरे
यवतमाळातून बिपीन चौधरी, दिग्रसमधून संजय ठाकरे, उमरखेडमधून डॉ. विश्‍वनाथ विणकरे, वणीतून डॉ. महेंद्र लोढा, पुसदमधून इंद्रनील नाईक, राळेगावमधून डॉ. अरविंद कुळमेथे.

विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले आहेत. 

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या वेळी आघाडी झाली, पण युतीचे घोंगडे भिजत पडलंय. परंतु, पक्षांतर्गत बंडखोरी आणि मतविभाजनाने उमेदवाराला धडा शिकवण्याचेही प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतविभाजनाचे प्रयत्नही केले जात आहेत. भाजप-शिवसेनेतही तणावपूर्ण शांतता दिसते. या वेळी रिंगणात नवीन चेहरे उतरतील, असे दिसते.

यवतमाळमधून पालकमंत्री व भाजपचे आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. सरकारमधील सर्वाधिक खाती त्यांच्याकडे आहेत. युती होवो वा न होवो, अपक्ष उमेदवार संतोष ढवळे यांचे आव्हान या वेळीही त्यांच्यासमोर असण्याची शक्‍यता आहे. ‘प्रहार’कडून बिपिन चौधरींचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांना घोषित झाली आहे. त्यामुळे येरावार व मांगूळकर यांच्यात थेट सामन्याची शक्यता आहे.

आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना पुन्हा तोच सामना खेळावा लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांचे आव्हान असू शकते. तर, दिग्रसमधून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांचा सामना या वेळी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक संजय ठाकरे यांच्याशी होऊ शकतो.

वणी मतदारसंघातून खासदार बाळू धानोरकर यांनी संजय देरकर यांचे नाव पुढे केलंय, तर काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावारही इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळते यावर गणित अवलंबून असेल. भाजपकडून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारीची शक्‍यता असली, तरी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हेही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून डॉ. महेंद्र लोढा यांची तयारी आहे. 

पुसदमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील लढणार आहेत. परंतु, ते शिवसेनेकडून की भाजपकडून, ही बाब स्पष्ट नाही. भाजपकडे आमदार ॲड. नीलय नाईक यांनीही उमेदवारी मागितली आहे. येथे दोन नाईकांमध्येच लढतीची शक्‍यता आहे. उमरखेडमधून भाजपचे आमदार राजेंद्र नजरधनेंचा दावा असला, तरी पक्षाकडे अनसूचित जाती सेलचे अध्यक्ष भाविक भगत यांनीही उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे डॉ. विश्‍वनाथ विणकरेंनी तीन वर्षांत मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांचीही तीव्र इच्छा आहे. येथे माजी आमदार विजय खडसे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. 

आर्णीतून भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी हवी आहे. परंतु, त्यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव येरमे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून ॲड. शिवाजीराव मोघे यांची उमेदवारी पक्की मानली जाते. तथापि, युती होणे आणि आघाडीचे जागावाटप यावर खूप काही अवलंबून असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhansabha 2019 Yavatmal District Politics