महाशिवरात्रीला भक्तांची मांदियाळी 

महाशिवरात्रीला भक्तांची मांदियाळी 

भंडारा - कोट्यवधी भक्‍तांचे आराध्य दैवत असलेल्या भगवान शंकराची स्थाने असलेली यात्रास्थळे आज भक्तांच्या गर्दीने फुलून निघाली होती. "महादेवा जातो गा...', "हर बोला... हर हर महादेव' असा गजर करीत डोंगरदऱ्यात, पहाडावर तसेच शहरातील मंदिरांत आज भक्तांनी मोठ्या श्रद्धा व भक्तीने महादेवाचे दर्शन घेतले. जिल्ह्यात गायमुख, कोरंभी (पवनी), झिरी (नांदोरा), डोंगर महादेव (नेरला), किटाळी (डोंगर), हत्तीडोई, गिरोला, कोका (लाखा पाटील), शिवतीर्थ (खुनारी) खांबतलाव येथील बहिरंगेश्‍वर मंदिरात भक्तांची मांदियाळी जमली होती. 

महाशिवरात्रीपासून सुरू झालेली यात्रा पाच दिवस चालणार आहे. पहाटेपासूनच यात्रास्थळी भाविकांचा ओघ सुरू झाला होता. दुपारी कडक ऊन होत असल्याने गडावर चढण्यासाठी अनेकांनी पहाटेला सुरुवात केली. गावाजवळ राहणारे लोक मोटारसायकल, ट्रॅक्‍टर, ट्रक तर दुरून येणारे भाविक कार, ऑटो व जीपगाड्यांनी यात्रास्थळी दाखल झाले होते. 

गायमुख हे ठिकाण लहान महादेव म्हणून ओळखले जाते. येथे लहान मुलांची नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. नंदी हे शंकराचे वाहन असून, नवसाचा नंदी शंकराला वाहण्याची प्रथा आहे. गावखेड्यातून वाजतगाजत कुटुंबासह पोहा घेऊन येणाऱ्यांची संख्या अधिक होती. महादेवाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. 

यात्रा परिसरात सामाजिक कार्यकर्ते व राजकीय लोकांच्या शुभेच्छांचे बॅनर लागले होते. त्यांच्यातर्फे भाविकांसाठी पाणी, महाप्रसाद तसेच खिचडीचे वाटपसुद्धा करण्यात आले. पोलिस विभागातर्फे सुरक्षेची चोख व्यवस्था होती. आरोग्य विभागाचे पथकही यात्रास्थळी भाविकांच्या सोयीसाठी तैनात होते. 

यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल 
महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी भरणाऱ्या यात्रेत मोठ्या संख्येने दुकाने लागली होती. यात सौंदर्यप्रसाधने, खेळणी, खाद्यपदार्थ, फराळ, फळे-फुले, पूजेचे साहित्य यांच्यासह नाना तऱ्हेच्या साहित्यांच्या दुकानांचा सहभाग होता. यात्रेत येणारे भाविक यानिमित्ताने खरेदी करीत असल्याने यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते. या निमित्ताने स्थानिक नागरिकांनाही रोजगार प्राप्त झाला. 

परिवहन विभागातर्फे अतिरिक्‍त बसफेऱ्या 
तीर्थस्थानी जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी परिवहन महामंडळाने विशेष बसफेऱ्यांची सोय केली होती. त्यामुळे आंभोरा, गायमुख, प्रतापगड व अन्य यात्रास्थळी जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी बसस्थानकावर दिसून आली. 

बहिरंगेश्‍वर मंदिरात गर्दी 
भंडारेकरांची ग्रामदेवता असलेल्या बहिरंगेश्‍वर मंदिरात आज दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भाविकांनी बहिरंगेश्‍वर महादेवाचे दर्शन घेतले. यानिमित्त भाविकांनी खिचडी, महाप्रसादाचे वितरण धार्मिक व सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आले. परिसरात भरलेल्या यात्रेत विविध प्रकारच्या दुकानांची रेलचेल होती. माठांचा बाजार हे यात्रेचे विशेष आकर्षण होते. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरिकांनी माठ खरेदीसाठी गर्दी केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com