फिरत्या बातमीदाराची डायरी : गांधीविचारांसाठी संघर्ष

बहार नेचर फाउंडेशनचे दिलीप विरखेडे व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग गोसावी.
बहार नेचर फाउंडेशनचे दिलीप विरखेडे व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग गोसावी.

वर्ध्यातील सेवाग्रामच्या समोरच असलेलं राजेंद्र प्रसाद भवन तोडण्यात आलंय. ही वास्तू तोडायला नको होती. तिथं तुम्ही आता सिमेंटच्या मोठ्या इमारती उभ्या कराल. पण, या वास्तूंचं असणारं महत्त्व त्यांना येईल का..? गांधीजींच्या छायेत वाढलेले स्वातंत्र्यसेनानी पाडुरंग गोसावी वैतागून सांगत होते. गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्तानं सेवाग्रामला मूळ स्वरूपात जपलं जावं, यासाठी त्याचा जागतिक वारसा दर्जा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश केला जावा, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशननं केली आहे. गेले वर्षभर त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र, त्याला पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. सेवाग्राम त्याच्या मूळ स्वरूपातच जपलं जावं आणि गांधी विचारांचीच माणसं त्यासाठी असतील, तर बापूजींच्या विचारांनुसार ते जपलं जाईल, त्यात भेसळ होणार नाही, असा आग्रह गोसावींनी धरला आहे.  

वर्ध्यामध्ये येऊन कुठलाच राजकीय पक्ष महात्मा गांधींच्या नावाखाली निवडणुकीचा प्रचार करीत नाही. पण, कुठल्याच मोठ्या राजकीय पक्षाला वर्ध्याला वगळून पुढं जाता येत नाही. इथल्या जुन्या-जाणत्या लोकांमध्येच नाही, तर तरुणांमध्येदेखील गांधी विचार भिनलाय. अंधश्रध्दानिर्मूलनाचे कार्यकर्ते किशोर वानखेडे यांनी अभिमानानं सांगितलं, वर्ध्याच्या इतिहासात कधीच कुठली दंगल किंवा तणाव निर्माण झाला नाही. राजकीय पक्षांकडून नसलं, तरी वर्धाकरांकडून मात्र अहिंसेचं पालन होतं. गांधी विचारांनी प्रेरित असलेल्या बहार नेचर फाउंडेशनला यातूनच सेवाग्रामलादेखील जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यास त्याचं जतन करता येईल, असं वाटतं. सेवाग्रामला जागतिक वारसाचा दर्जा मिळावा, ही मूळ कल्पना शिक्षक असलेल्या दिलीप विरखेडे यांची. ते सांगतात, वर्ध्यामधून सलग तीनवेळा काँग्रेसचे वसंत साठे लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी वर्ध्यामध्ये सेवाग्रामच्या जवळ लॉईड स्टील कंपनीचा कारखाना आणला. स्टीलच्या कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात वर्धाकरांनी मतदान केलं, वसंत साठेंचा पराभव झाला. वर्धाकरांसाठी सेवाग्राम पवित्र भूमी आहे. सेवाग्रामला जागतिक वारशाचा दर्जा मिळाला, तर बांधकामांवरही नियंत्रण येईल.

महात्मा गांधींचं सेवाग्राम टिकवायचं असेल, तर ते मूळ स्वरूपातच टिकवलं जावं, यासाठी वर्ध्यातील काही जाणकार मंडळी पुढं आली आणि त्यातून ‘गांधी फॉर टुमारो’ ही कल्पना पुढं आली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिली, केंद्र सरकारनंदेखील त्या प्रकल्पाला साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. दरम्यान केंद्रात, राज्यात सरकार बदललं. ‘गांधी फॉर टुमारो’ या प्रकल्पाचं नाव ‘सेवाग्राम विकास आराखडा’ करण्यात आलं. प्रकल्पाचा खर्च कमी करण्यात येऊन २८० कोटींवर आला. गेल्या चार वर्षांत या प्रकल्पावर फक्‍त ४८ कोटींपर्यंत खर्च झालेत. याच प्रकल्पाच्या अंतर्गत सिमेंटचा भला मोठा चरखा सेवाग्राममध्ये बसविण्यात आला. 

पांडुरंग गोसावी १९६०च्या सुमारास सेवाग्रामचे सरपंच होते. महात्मा गांधीजींचा विचार टिकविण्याबरोबरच १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याचं महत्त्वाचं केंद्र ठरलेल्या सेवाग्रामला जागतिक वारशाचा दर्जा मिळाला, तर सेवाग्राम टिकेल, या बहार नेचर फाउंडेशनच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे. नयी तालीमच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी पांडुरंग गोसावी याच शाळेत पुढं कताईचे शिक्षक झाले. या गोसावी गुरुजींना पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सूतकताईसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सेवाग्राममध्ये आमच्यासोबत फिरताना ते सेवाग्राममधील खादीच्या कपड्यांची विक्री केल्या जाणाऱ्या दुकानात आले. कपड्यांवरून हात फिरवत म्हणाले, की आता निखळ खादी सेवाग्राममध्येपण मिळत नाही. खादीची ही दुकानं आलीत तिथं ताणात खादी आणि बाणात दुसरं सूत असतं. खादीचं सूत म्हणजे धागा नाही. भारतीय स्वातंत्र्याचा लढा याच चरख्यावर विणला गेलाय. खादीत भेसळ म्हणजे बापूजींच्या विचांरातही भेसळ करण्यासारखं आहे. अशाने गांधी विचार टिकविण्याच्या नावाखाली मिटविला जात असल्याची खंत व्यक्‍त करीत गोसावी गुरुजी त्यांच्या घराकडे परतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com