साद घालतेय बापूंच्या अस्तित्वखुणांची प्रेरणाभूमी

रविराज घुमे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

सेवाग्राम (जि. वर्धा) : महात्मा गांधी यांच्या पाऊलखुणा आजही सेवाग्राम आश्रमात सापडतात. येथील आल्हाददायक नीरव शांतता, मन प्रसन्न करणारे प्रेरणादायी वातावरण आणि महात्म्याच्या विचार-कृतींना नव्या पिढीत रुजविण्याकरिता राबविले जाणारे विविध उपक्रम हे या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे. साधेपणा आणि मोठेपणा या दोन गोष्टी आपल्याला इथे सहज भेटतात. गांधीजींची बापूकुटी, चित्रप्रदर्शन, त्यांनी लिहिलेली, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके, खादीचे कपडे आणि प्रेरणेचा झरा अखंड तेवत ठेवणाऱ्या राष्ट्रपित्याच्या अस्तित्वखुणा.

महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात सलग 11 वर्षे राहिले. त्यांच्या आगमनाने पूर्वीच्या "सेगाव'चे सेवाग्राम असे नामकरण झाले. देशभरातील पुरोगामी, परिवर्तनवादी, कष्टकरी-शेतकऱ्यांच्या संघटना-संस्था, विद्यार्थी-सामाजिक कार्यकर्त्यांचे समूह या प्रेरणाभूमीत येतात, प्रशिक्षणवर्ग, कार्यशाळांच्या माध्यमातून बापूंच्या सहवासात नवी उमेद घेऊन जातात. महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रमात अनेक प्रयोग केले.

ग्रामसफाईपासून तर ग्रामोद्योगापर्यंत. चरखा सूतकताई, आंतरजातीय विवाह, बुनियादी शिक्षण, सांप्रदायिक ऐक्‍य, नैसर्गिक उपचार केंद्र, गोशाळा, गूळ कारखाना हे त्यातील काही. यातील नैसर्गिक उपचार केंद्र, सांप्रदायिक ऐक्‍य, खादी उत्पादने, ग्रामोद्योग, आंतरजातीय विवाह याकरिता सहकार्य करण्याचे कार्य आताही आश्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. महात्मा गांधींच्या बुनियादी शिक्षण प्रणालीचे नामांतर करून आनंद निकेतन नावाने नई तालीम समितीच्या वतीने शाळा चालविली जाते. या शाळेची जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे. जीवनानुभवावर आधारित कला-कौशल्यावर भर देणारे शिक्षण या शाळेतून दिले जाते.
आश्रमातील गोशाळेत 51 जनावरे असून, यातून होणारे दुग्ध उत्पादन आश्रमात होणाऱ्या कार्यक्रमांकरिता वापरले जाते. आश्रमाच्या मालकीची 115 एकर शेती असून, बागायती, जिरायती शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते. काही शेतीक्षेत्रात संत्रा, मोसंबी, फणस, डाळिंब, पपई आहे, तर काही क्षेत्रात भाजीपाल्याचे पीक घेतले जातात.

खादी वीणकाम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. आश्रमात एक यंत्रमाग असून, सूतकताईसाठी 10 चरखे नियमित सुरू आहेत. यातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आश्रमाच्या वतीने युवकांकरिता वर्षांतून 12 ते 15 शिबिरे आयोजित केली जातात. गांधी जयंती, हुतात्मा दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताकदिनी स्वच्छता अभियान राबविले जाते. यात तरुणांचा, विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. महात्म्याच्या पाऊलखुणा आजही या आश्रमात पावलोपावली दिसून येतात. येथे मिळणारी मनःशांती शब्दात बंदिस्त करणे अवघड आहे.

उमेदीची पेरणी
गांधीविचारांचा प्रसार-प्रचार आश्रम प्रतिष्ठान आजही जोमाने करीत आहे. देशभरात सर्व सेवा संघाच्या माध्यमातून वर्तमान-भविष्यकालीन आव्हाने आणि गांधीविचार यावर मंथन सुरू असते. महत्त्वाचे असे, की सर्व सेवा संघाचे मुख्यालयही सेवाग्रामातच आहे. सेवाग्राम आश्रमाचे प्रेरणाभूमी मोल शब्दातीत आहे. म्हणूनच जगभरातील मंडळी बापूंच्या पाऊलखुणा शोधत, उमेदीची पेरणी करण्याकरिता सेवाग्राम आश्रमाची वाट धरतात.
 

Web Title: mahatma gandhi's mark at seva gram