‘माझी मेट्रो’ जर्मनीतील मेट्रोपेक्षाही ‘फास्ट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

नागपूर - नागपुरातील ‘माझी मेट्रो’चे काम जर्मनीतील मेट्रो रेल्वेच्या कामापेक्षाही वेगाने होत आहे. त्यामुळे माझी मेट्रो निश्‍चित कालावधीत धावेल, असा विश्‍वास या प्रकल्पाला चार हजार कोटींचे कर्ज देणाऱ्या जर्मनीच्या केएफडब्ल्यू एजन्सीच्या दक्षिण आशिया प्रादेशिक व्यवस्थापक यास्मिन तौफिक यांनी सांगितले. एकूणच मेट्रोचे डिझाइन अद्वितीय असल्याचे नमूद करीत माझी मेट्रोवर त्यांनी स्तुतिसुमने उधळली. 

नागपूर - नागपुरातील ‘माझी मेट्रो’चे काम जर्मनीतील मेट्रो रेल्वेच्या कामापेक्षाही वेगाने होत आहे. त्यामुळे माझी मेट्रो निश्‍चित कालावधीत धावेल, असा विश्‍वास या प्रकल्पाला चार हजार कोटींचे कर्ज देणाऱ्या जर्मनीच्या केएफडब्ल्यू एजन्सीच्या दक्षिण आशिया प्रादेशिक व्यवस्थापक यास्मिन तौफिक यांनी सांगितले. एकूणच मेट्रोचे डिझाइन अद्वितीय असल्याचे नमूद करीत माझी मेट्रोवर त्यांनी स्तुतिसुमने उधळली. 

एअरपोर्ट साऊथ ते खापरीपर्यंत जर्मनीच्या पथकाने आज मेट्रोतून प्रवास केला. अर्थसाहाय्य करणाऱ्या सांघिक मंत्रालयाचे दक्षिण आशिया विभागाचे भारतातील प्रमुख डॉ. वोल्फ्राम क्‍लेन यांच्या नेतृत्वातील पथकात वरिष्ठ अधिकारी लिस्बेथ मुलर, जर्मन दूतावासातील अर्थपुरवठा  विभागाच्या प्रमुख सुजेन डोरासिल, केएफडब्ल्यू बॅंकेच्या दक्षिण आशिया विभागाच्या व्यवस्थापक यास्मिन तौफिक, केएफडब्ल्यूच्या भारतातील नागरी विकास क्षेत्राचे तज्ज्ञ पास्कल सावेड्रा, केएफडब्ल्यूतील नागरी विकास व वाहतूक विभागाचे प्रधान अभियंता पिटर रुनी, स्वाती खन्ना, भारताच्या नागरी विकास विभागाच्या अधिकारी ममता बत्रा आदींचा समावेश होता. 

प्रवासादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना यास्मिन तौफिक म्हणाल्या, की ५० टक्के परतावा हा प्रॉपर्टी डेव्हलपमेंटमधून मिळणार आहे. आतापर्यंत देय चार हजार कोटींच्या कर्जापैकी २५ टक्के निधी मेट्रोला देण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी कर्जाबाबत अद्याप प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यास सर्व बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ठाणे, पुणे मेट्रो विस्तार तसेच नागपूर मेट्रो विस्तारासाठी कर्जाबाबत सकारात्मक असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. वोल्फ्राम क्‍लेन यांनी मेट्रोसोबत फिडर सेवाही उत्तम हवी, असे सांगितले. दिलेल्या कर्जातून सायकल, बस आदी फिडर सेवाही उपलब्ध होईल. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून नागरिकांच्या जीवनात बदल घडविणारा असल्याने जर्मनीच्या धोरणानुसार कर्जपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, कर्ज देताना सर्व बाबी तपासूनच दिले जाते, असेही त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षात भारतात आठ हजार कोटी रुपये विविध प्रकल्पांना कर्ज म्हणून देण्याबाबत भारत सरकारशी करार झाल्याचे ते म्हणाले. यात तामिळनाडूतील विजेवर चालणाऱ्या बस प्रकल्पाचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, वित्त विभागाचे शिवामाथन, मेट्रो देखभाल, दुरुस्ती महाव्यवस्थापक उराडे, अखिलेश हळवे आदी उपस्थित होते. 

चांगले ‘मॉडेल’ तयार
प्रवासादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना यास्मिन तौफिक यांनी मेट्रोचा प्रकल्प वेळेत पूर्ण होताना दिसत असल्याचे नमूद केले. तिकीट दरातून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून न राहता स्टेशन, कार्यालयांत व्यावसायिक वापरासाठी जागा उपलब्ध करून देत महामेट्रोने चांगले ’मॉडेल’ तयार केल्याचे त्या म्हणाल्या.

 

Web Title: majhi metro german metro