महाराष्ट्रातही जपली दक्षिणेच्या संस्कृतीची नाळ...वाचा 

सूरज पाटील
बुधवार, 15 जानेवारी 2020

सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण म्हणजे संक्रांत. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, म्हणून मकरसंक्रांत असे नाव प्रचलित झाले. तामिळनाडू राज्यात पोंगल सणाला विशेष महत्त्व आहे.

 यवतमाळ : मकरसंक्रांत आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा सण. देशाच्या जवळपास सर्वच भागांत हा सण उत्साहात साजरा केला जातो. नोकरीच्या निमित्ताने दक्षिणेतून (तामिळनाडू) महाराष्ट्रात आलेले पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या संस्कृतीची नाळ तुटू दिली नाही. पोंगल, भोग, मट्टू पोंगल, कानू पोंगल चारही दिवस राजकुमार कुटुंबीय हा सण उत्साहात साजरा करतात. 

सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण म्हणजे संक्रांत. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, म्हणून मकरसंक्रांत असे नाव प्रचलित झाले. तामिळनाडू राज्यात पोंगल सणाला विशेष महत्त्व आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्या निसर्गाचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात दिवाळी सणाला घराची रंगरंगोटी व स्वच्छता केली जाते. 

अवश्य वाचा - वडिलांच्या प्रेमाला मुकल्याने तीने केले असे...
 

मात्र, दक्षिणेत पोंगल सण दिवाळीप्रमाणेच साजरा केला जातो. पोंगल येण्यापूर्वी विशेषत: महिला, सदस्य घराला फुले व फांदीच्या तारांनी स्वच्छ करून ठेवतात. मोठ्या मातीच्या भांड्यात सुशोभित करण्यासाठी स्वस्तिक व कुंकू वापरतात. गोड भात शिजवलेले अन्न सूर्याला अर्पण केले जाते. पहिला दिवस भगवान इंद्राच्या सन्मानार्थ भोगोत्सव म्हणून साजरा केला जातो. एकप्रकारे दिवसाची नवीन सुरुवातच केली जाते. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य पारंपरिक वेशभूषा धारण करतात. घराला ऊस आणि हळदीचे तोरण लावतात. 

अधिक माहितीसाठी - सांग सांग भोलानाथ किती वाघ आहे या जंगलात?

मोकळ्या मैदानात चुलीवर भोग बनवून सूर्यदेवतेला अर्पण करतात. मट्टू पोंगलला बैल, गायींसाठी ओळखले जाते. विविध रंगीत मणी, घंटा, मणी व पुष्पमाला शेळ्यांचा व गुरांचा मानेला बांधली जाते आणि नंतर त्याची पूजा केली जाते. त्यांना पोंगलला अन्न दिले जाते. कानू किंवा कान्नुम पोंगलला संपूर्ण कुटुंबीय एकत्र येतात. गोडधोड पदार्थ खातात. मंदिर अथवा प्रेक्षणीय स्थळाला भेट देवून दिवस एकत्र घालवितात. विशेष म्हणजे हा उत्सव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, रम्या राजकुमार घरी दरवर्षी साजरा करतात. यावेळी दक्षिणेतील अधिकारीही एकत्र येतात. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, बाहेरील

विदर्भातही सूर्यनारायणाची पूजा

नववर्षात येणारा पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीला विदर्भातही खूप महत्त्व आहे. या दिवशी महिला सकाळीच घरी सूर्यनारायणाची प्रतिमा काढून तिची पूजा करतात. सूर्याला अर्घ्य देऊन त्याच्या दररोजच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्‍त केली जाते. सुवासिनी महिला एकमेकींना वाण देऊन, तिळगूळ वाटतात. याच दिवसापासून दिवस तिळतिळ वाढतो. बच्चे कंपनींसह बडेही या दिवसात पतंग उडविण्याचा आनंद घेतात. हिवाळ्याच्या दिवसात हवीहवीशा असलेल्या उन्हात सकाळपासून पतंग उडवून आनंदोत्सव साजरा केला जातो. 

 

पर्यावरण रक्षणासाठी पुढे या 
संस्कृतीचा पाया निसर्ग आहे. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरण रक्षण करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. हा आदर्श आपण पुढील पिढीला घालून दिला पाहिजे. 
-एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, यवतमाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makarsankranti news about tamil family in Maharashtra