राष्ट्रहितासाठी करा अवयवदान-देहदान 

राष्ट्रहितासाठी करा अवयवदान-देहदान 

रामदासपेठ - परंपरेच्या नावावर आपण मृतदेह एकतर दफन करतो किंवा अग्नी देतो. विज्ञान विकसित नव्हते तेव्हा मृतदेहाची अशी विल्हेवाट लावणे यात गैर नव्हते. परंतु, आता देहदानासोबतच नेत्रदान आणि अवयवदानही झाले पाहिजे, असा सूर ‘सकाळ संवाद’मध्ये मांडण्यात आला. मानवी देह त्याच्या मृत्यूउपयोगी ठरतो, हे जाणून आता प्रत्येकानेच देहदान आणि अवयदानाचा संकल्प सोडून राष्ट्रकार्यात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही करण्यात आले.   

१३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन आहे. त्यानिमित्ताने देहदान आणि अवयवदान या क्षेत्रातील कार्यकर्ते, तज्ज्ञ, देहदानाचा संकल्प सोडलेल्या आणि प्रत्यक्ष आपल्या नातेवाइकांचे अवयवदान करून या चळवळीत सहभागी झालेल्या मंडळींसोबत चर्चा करण्यात आली. यात प्रा. डॉ. सुशील मेश्राम, महेंद्र उके, सुरेश दुबे, अनिल पेटकर, डॉ. त्रिंबक बोंदरे, संजय शहारे, मदन नागपुरे, डॉ. अंकुश बुरंगे, मधुकर धंदरे, संगीता व दिलीप नखाते, सुनीता व रमेश ढवळे, डॉ. अरुण देवरे, प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे, शेषराव कांबळे यांचा सहभाग होता.  

पोटच्या मुलाची किडनी आणि डोळे दान 
आमचा अत्यंत हुशार मुलगा अभिषेक १४ जानेवारी २०१५ रोजी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘ब्रेनडेड’ होऊन जग सोडून गेला. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु, तरीही त्याचे डोळे आणि किडनी दान करण्याचा निर्णय आम्ही घेतला, अशी भावना अभिषेकचे वडील दिलीप आणि आई संगीता नखाते यांनी व्यक्‍त केली. 

पत्नीच्या मृत्यूनंतर नेत्रदान 
हिंगणा पंचायत समितीत शिक्षण विभागात असलेले केंद्रप्रमुख शेषराव कांबळे यांनी त्यांच्या पत्नीचे मरणोत्तर नेत्रदान केले. माझ्या पत्नीच्या मृत्यूने मी पुरता हादरून गेलो. परंतु, ती नेत्ररूपी उरावी, या भावनेने मी अपार दुःखातही तिच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे ती अजूनही जग पाहते आहे, अशी माझी भावना आहे, असे शेषराव कांबळे यांनी सांगितले. 

कुटुंबातील २८ सदस्यांचा देहदानाचा संकल्प 
२०१५ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर माझ्या कुटुंबातील २८ सदस्यांनी देहदानाचा संकल्प केला. यात माझ्या ७८ वर्षीय वडिलांपासून २ वर्षांच्या मुलापर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे. हे कार्य केवळ परिवाराएवढेच मर्यादित न राहता सामाजिक करण्याची माझी इच्छा आहे, असे मत प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांनी व्यक्त केले.  

मेडिकल हेच खरे तीर्थक्षेत्र 
डॉ. चंद्रकांत मेहर यांनी तर ‘देहदानाची व्याप्ती’ या विषयावरच पीएच.डी. केली. या क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर ३६ ते ४० प्रकारचे अवयवदान होते. मात्र, भारतात वैज्ञानिक सोयी नसल्याने एवढ्या प्रमाणात अवयवदान होत नाही. खरे तर वैद्यकीय महाविद्यालय हेच तीर्थक्षेत्र आहे. कारण, येथे देहदानात श्रीमंत-गरीब, जात-धर्म असा भेदभाव होत नाही.

अंधश्रद्धा आडवी येते  
आमचा सुमारे ४०० महिलांचा समूह अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो. देहदानात अंधश्रद्धा आडवी येते. त्यामुळे मी स्वतःपासूनच सुरुवात करायचे ठरविले. रमाई स्मृतिदिनी आम्ही दोघांनीही देहदानाचा संकल्प केला, अशी माहिती सुनीता आणि रमेश ढवळे या दाम्पत्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com