नागपूरला व्यापारी हब बनवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

नागपूर : देशातील सर्वांत मोठे व्यापारी हब म्हणून नागपूरच्या विकासासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेऊन व्हिजनबेस आराखडा तयार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र व राज्यात आमचेच सरकार असल्याने चेंबरने तयार केलेल्या आराखड्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत केली जाईल, असे सांगताना ते दीर्घकालीन उपयोगी असावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शनिवारी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी, समितीचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, संयोजक बी. सी. भरतीया, सचिव संजय अग्रवाल, खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. गडकरी यांनी चेंबरसोबतचा पहिला संबंध विरोधी पक्षात असताना आंदोलनात व्यापाऱ्यांनी बंदला सहकार्य करण्यासाठी केलेल्या विनंतीच्या वेळीच आल्याची आठवण करून दिली. हे सांगताना सत्तेत कधी येऊ, असे स्वप्नातही वाटले नसल्याचेही स्पष्ट केले.
वेळ बदलत असतो तसेच आम्ही सत्तेत आलो आहे. शहरातील सहा रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार असून, त्यात शहीद चौक, इतवारी, किराणा ओळीतील दुकाने जाणार आहेत. त्यांना चांगल्या ठिकाणी प्रशस्त व वातानुकूलित बाजारपेठेत वाजवी दरात जागा देण्यात येणार आहे. तो आराखडा एनव्हीसीसीने पाहावा आणि सुधारणा सुचवाव्यात. एनव्हीसीसीने प्लॅस्टिक, रेडिमेड गारमेंट, टेक्‍सटाईल उद्योगातील जाणकार व अनुभवी उद्योजकांचे एक्‍स्पर्ट सेल्स बनवावेत, अशी सूचनाही गडकरी यांनी केली. त्यामुळे ट्रेड, उद्योग आणि रोजगार वाढेल. लॉजिस्टिक पार्कसाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे नितीन गडकरी यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.
तत्पूर्वी, ज्येष्ठ पत्रकार सोपान पांढरीपांडे आणि आनंद निर्वाण यांचा गडकरी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अमृतपुष्प या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक हेमंत गांधी यांनी केले. बी. सी. भरतीया यांनी एनव्हीसीसीच्या प्रवासाची माहिती दिली. संचालन संजय अग्रवाल यांनी तर उपाध्यक्ष फारुक अकबानी यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Nagpur a commercial hub