वैनगंगा नदी पात्रात पर्यटन हब विकसित करा; परिसरातील नागरिकांची मागणी 

सहदेव बोरकर | Tuesday, 24 November 2020

सिहोरा परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी निसर्गाने भरभरून दिले आहे. परंतु शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील राहत नाही. या संधीचे सोने करण्याचे प्रयत्न होत नाहीत.

सिहोरा (जि. भंडारा) ः वैनगंगा नदीच्या पात्रात कवलेवाडा धरणांत पाणी अडविण्यात आल्याने पर्यटनस्थळाच्या विकासाकरिता अनुकूल वातावरण झाले आहे. या नदीच्या पात्रात बोटिंग व्यवसायाला मंजुरी दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नदी पात्रात 18 किमी अंतरापर्यंत पर्यटन हब विकसित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. परंतु लोकप्रतिनिधी रस्ते, नाल्यांच्या विकासातच गर्क आहेत. यामुळे नवीन प्रकल्पांचा विकास होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.

सिहोरा परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी निसर्गाने भरभरून दिले आहे. परंतु शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील राहत नाही. या संधीचे सोने करण्याचे प्रयत्न होत नाहीत. या परिसरात वैनगंगा, बावनथडी नद्यांचे खोरे आहेत. वाळूचोरीकरिता राज्यात हा भाग हिटलिस्टवर आला आहे. वाळूचोरीने माफिया गब्बर होत आहेत. परंतु, ज्या गावांना नद्यांचे वैभव मिळाले आहेत, अशा गावांत रोजगाराची वानवा आहे.

सविस्तर वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

Advertising
Advertising

रस्ते दुरुस्तीचा खर्च गावकऱ्यांच्या सामान्य फंडांतून खर्च होत आहे. यामुळे गावांत भकास चित्र दिसत आहे. गावात नाल्याची स्वच्छता करण्यास ग्रामपंचायतीकडे निधी नाही. नदीच्या पात्रात कवलेवाडा धरणात पाणी अडविण्यात आले आहे. पिपरीचुन्नी ते बपेरा गावापर्यंत पाणीच पाणी आहे. 12 किमी अंतरापर्यंत बॅकवॉटर भरले आहे. बपेरा गावानंतर गोंदिया जिल्ह्यातील गावांपर्यंत पाणी विस्तारित आहे. या 12 किमी अंतराच्या मार्गात चुल्हाड, वांगी, देवरीदेव, सुकळी नकुल, बपेरा गावे येत आहेत. या काठावर देवीदेवतांची मंदिरे आहेत. गावकऱ्यांचे आस्थेचे ठिकाण असल्याने येथे यात्रांचे आयोजन करण्यात येते. नदीकाठावर विहंगमदृश्‍य निर्माण होत आहे. यामुळे देवस्थान परिसरात भक्त भाविकांची रेलचेल राहते. यात्रा उत्सव आठवडाभर असते. परंतु या संधीचे सोने करण्यात येत नाही. गावात रस्ते आणि नाली म्हणजे विकास असे समीकरण झाले आहे.

वैनगंगा, बावनथडी या दोन नद्यांचे संगम असून गायखुरी देवस्थान आहे. पर्यटनविकासाच्या दृष्टीने नदीचे पात्र अनुकूल आहे. या पात्रात बोटिंग व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे. या भागात नदीत डोह नाही. त्यामुळे बुडण्याची मभीती राहत नाही. या गावात मासेमारीवर ढिवर बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. बोटिंगमुळे या समाज बांधवांना जोडधंदा उपलब्ध होईल. या शिवाय ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होईल.

पर्यटन हब उभारण्याची संधी

सिहोरा परिसरात पिपरी चुन्नी ते बपेरा गावापर्यंत पर्यटन हब उभारण्याची संधी आहे. नदीच्या पात्रापासून 2 ते 3 किमी अंतरावर गावे असल्याने गावांना हटविण्याचा प्रश्न येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नद्यांचे काठावरील नागरिक विकासाकरिता ओरड करीत आहेत. परंतु त्यांना रोजगार देण्याचे प्रयत्न होत नाहीत. नदी पात्रात बोटिंग व्यवसायाने नागरिकांची रेलचेल वाढणार असल्याने अन्य व्यवसायाला भरभराटीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही.

नवीन प्रकल्प राबविण्याकडे दुर्लक्ष

लोकप्रतिनिधी मुंबई आणि दिल्ली दरबारात नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी मंथन करीत नाही. रोजगाराच्या संधीसाठी साधा प्रस्ताव तयार करत नाही. त्यामुळे 40 वर्षांपासून ‘जैसे थे’ स्थिती आहे. जिल्हा परिषदस्तरावर अशा योजनाचे नियोजन करीत नाही. स्थायी समितीच्या बैठकीत साधी चर्चा करण्यात येत नाही. प्रायोगिक तत्त्वावर एखाद्या गावांत नवीन प्रकल्प राबविण्याचे प्रयत्नही होत नाही.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

चांदपूरच्या विकासाला खीळ

सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत बसलेल्या चांदपूर गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. चांदपूर जलाशयात जलतरण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत नाही. बोटिंग व्यवसायाला मंजुरी देण्यात आली नाही. पर्यटनस्थळाच्या विकासाकरिता निधी नाही. जागृत हनुमान देवस्थान, ऋषी मुनी आश्रम, चांदशॉ वली दर्गाहचा विकास करण्याची मानसिकता नाही. कार्यकर्ते आणि स्थानिक नेते परिसरातील पर्यटनस्थळ विकासाचे मनावर घेत नाही. यामुळे दबाव निर्माण होत नाही. यामुळे परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर आहे. निवडणुकीत भलतेच मुद्दे प्रचारात येत आहेत. यामुळे परिसरात विकासाचा दुष्काळ पडला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ